चार मराठी तरुण एनडीएच्या १४५ च्या तुकडीमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:39+5:302021-05-21T04:11:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एनडीएच्या (नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी) सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या १४५ व्या तुकडीची लेखी परीक्षा पार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एनडीएच्या (नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी) सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या १४५ व्या तुकडीची लेखी परीक्षा पार करून डिसेंबर २०२० / जानेवारी २०२१ मध्ये एसएसबी पास करून चार मराठी तरुण संरक्षण दलात सामील झाले आहेत. त्यामध्ये सुमित कदम (सातारा), सोहम बाचल (पुणे), मयूरेश पाटील (जळगाव) आणि सागर जपे (कोपरगाव) या चौघांचा समावेश आहे. तर पुण्याचा जपमन अवतार हा तरुण ९ मे रोजी नेव्हल ॲकॅडमी, एझिमला येथे दाखल झाला आहे. या सर्व तरुणांनी एसएसबी मुलाखतीचे प्रशिक्षण ‘ॲपेक्स करिअर्स’मध्ये घेतले असून, त्यांना लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभले.
सुमित कदम हा साताराच्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. सुमितचे वडील विजय कदम हे सैनिक स्कूल सातारामध्ये लिपिक म्हणून कार्यरत असून त्याची आई ॲड. प्रविणा कदम भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय गुणवत्ता यादीत सुमितचा १२८ व्या स्थानावर नंबर आला असून तो आर्मी विंगच्या कॅडेट म्हणून ०२ एप्रिल २०२१ रोजी एनडीएमध्ये दाखल झाला आहे.
सोहम बाचलने डीईएस स्कूल, टिळक रोड येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सोहमचे वडील प्रशांत बाचल हे रुबी हाॅलमध्ये कार्यरत आहेत. त्याची आई चारूलता खासगी कार्यालयात कार्यरत आहेत. अखिल भारतीय गुणवत्ता यादीत ३१९ व्या स्थानावर सोहम आला असून तो ११ एप्रिल रोजी एनडीएमध्ये आर्मी विंगचा कॅडेट म्हणून दाखल झाला आहे.
जळगावचा मयूरेश पाटील याचे दहावीपर्यंतचे शिक्षण जळगावच्या काशिनाथ पल्लोड पब्लिक स्कूल येथे घेतले आहे. मयूरेशचे वडील डाॅ. दीपक पाटील हे शेती व्यवसायात असून त्याची आई शीतल पाटील गृहिणी आहे. एनडीएच्या गुणवत्ता यादीत तो २७४ च्या क्रमांकावर आला असून २३ एप्रिल रोजी तो एनडीएमध्ये नेव्हल कॅडेट म्हणून दाखल झाला आहे.
कोपरगावच्या सागर जपे याचे दहावीपर्यंतचे शिक्षण कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. सागरचे वडील गोकुळ जपे हे उक्कडगाव (तालुका कोपरगाव) येथील शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांची आई पंचशिला जपे गृहिणी आहे. गुणवत्ता यादीत ४३६ व्या क्रमांकावर आलेल्या सागर मे रोजी एनडीएमध्ये आर्मी कॅडेट म्हणून दाखल झाला.
खडकवासला पुणे येथे राहणाऱ्या जपमन अवतार याने भुकूम येथील संस्कृती स्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेतले. जपमनचे वडील कॅप्टन हरविंदर अवतार भारतीय नाैदलात कार्यरत असून नुकतेच पुण्याहून ते गोवा येथे कार्यरत झाले. त्याची आई संदीप काैर गृहिणी आहे. एनडीएच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत त्याचे ५१८ व्या स्थानावर नंबर आला असून त्याला एझिमला (केरळ) येथील इंडियन नेव्हल ॲकॅडमी येथे ९ मे रोजी रुजू होण्याच्या सूचना मिळाल्या व तो ९ मे रोजी नेव्हल ॲकॅडमी येथ दाखल झाला आहे.
---------------
सुमित, सोहम आणि सागर एनडीएच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर देहराडूनच्या आयएमएमध्ये एक वर्षाचे सैनिकी प्रशिक्षण घेतील. मयूरेश एनडीएचे तीन वर्ष प्रशिक्षणानंतर एझिमला येथे एक वर्ष नेव्हल ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेईल. जपमन हा मात्र पूर्ण चार वर्ष प्रशिक्षण नेव्हल ॲकॅडमीमध्ये घेईल. या सर्व तरुणांचे एकूण चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे संपल्यावर हे भारतीय सेनादलात आणि नाैदलात अधिकारी बनतील.
- लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त), ॲपेक्स करिअर्सचे संपादक