आणखी चार नवीन गावे महापालिकेत
By Admin | Published: November 20, 2014 04:22 AM2014-11-20T04:22:42+5:302014-11-20T04:22:42+5:30
हद्दीजवळील ३४ गावे पालिकेत येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच, आणखी चार नवीन गावे पालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्यास विधी समितीने बुधवारी हिरवा कंदील दिला
पुणे : हद्दीजवळील ३४ गावे पालिकेत येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच, आणखी चार नवीन गावे पालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्यास विधी समितीने बुधवारी हिरवा कंदील दिला. त्यामुळे आता पालिकेत ३४ नव्हे, तर ३८ गावे समाविष्ट होणार आहेत. मात्र, आधीच ३४ गावांमुळे पालिकेच्या समस्यांमध्ये वाढ होणार असल्याने निधीबाबत संभ्रमावस्था असल्याने या नवीन गावांच्या समावेशाबाबत मनसेने समितीच्या बैठकीत विरोध केला आहे. वडकी, आव्हाळवाडी, सणस नगर तसेच मांजरी खुर्द ही नवीन गावे आहेत. तर, ही गावे पालिका हद्दीत घेतली जावीत, यासाठी या चारही गावांनी या पूर्वीच ठराव करून राज्यशासनाकडे पाठविलेले आहेत.
बुधवारी हा प्रस्ताव चर्चेस आल्यानंतर, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना-भाजपाने त्यास पाठिंबा दिला, तर मनसेने विरोध केला. २ विरुद्ध ५ मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, नवीन ३४ गावे घेण्यासंदर्भात शासनाने २९ मे रोजी अधिसूचना काढली होती. त्यावरील हरकती व सूचनांची सुनावणी पूर्ण झालेली असल्याने या गावांसाठी शासनाला नव्याने अधिसूचना काढावी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)