Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:39 PM2024-07-21T12:39:46+5:302024-07-21T12:43:19+5:30
शहरातील झिकाचा संसर्ग हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली
पुणे : एक महिन्यापूर्वी म्हणजे २० जून राेजी यंदा ‘झिका’चा पहिला रुग्ण आढळला हाेता. आता महिनाभरातच ही रुग्णांची संख्या ३२ वर पाेहोचली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरातील झिकाचा संसर्ग हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसत नाही. शनिवारी शहरात आणखी चार रुग्णांना झिकाचे निदान झाले आहे. यामुळे शहरातील झिकाची रुग्णसंख्या आता ३२ वर पाेहोचली आहे.
येरवडा, वडगाव बुद्रुक, प्रभात राेड आणि लाॅ काॅलेज राेड येथील हे रुग्ण आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या ही ३२ वर पाेहोचली आहे. याद्वारे झिकाचा संसर्ग हा शहरात वेगाने हातपाय पसरत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस नवनवीन ठिकाणी याचे रुग्ण आढळून येत असल्याने झिका हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.
झिकाच्या चार रुग्णांपैकी लाॅ काॅलेज रस्त्यावरील एका २६ वर्षीय तरुणाला ताप, लाल चट्टे, सांधेदुखी अशी लक्षणे हाेती. तसेच वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर परिसरातील ३३ वर्षीय महिलेला तापाची लक्षणे हाेती. टिंगरेनगर, येरवडा येथील एका ७० वर्षीय ज्येष्ठाला याची लागण झाली आहे. त्यांना ताप, डाेकेदुखी, अशी लक्षणे दिसून आली. तर प्रभात राेड, डेक्कन येथेही एका ७६ वर्षीय ज्येष्ठाला याची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या चाैघांचा ‘झिका’चा अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आढळून आला. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून त्यांचे अहवाल प्राप्त झाले. यावर्षी झिकाचा पहिला रुग्ण हा एरंडवणेत आढळून आला होता. त्यामध्ये ४६ वर्षीय डाॅक्टर रुग्ण २० जून राेजी पाॅझिटिव्ह आला. तेव्हापासून आतापर्यंत ही संख्या महिन्याच्या आत ३२ वर पाेहोचली आहे. त्यापैकी ११ गर्भवती आहेत.
२८४ गर्भवतींचे नमुने तपासणीला
झिकाचा धाेका हा गर्भवतींच्या बाळाला असल्याने आतापर्यंत झिकाग्रस्त भागातील रुग्णांच्या घरापासून ५ किमीपर्यंतच्या परिसरातील सर्व गर्भवतींना सतर्क करण्यात येते. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतात.
११ गर्भवतींचा फाॅलाेअप
शहरात झिकाबाधित गर्भवतींची संख्या आता ११ वर गेली आहे. यात ८ गर्भवतींच्या गर्भधारणेचे १८ आठवडे उलटून गेले आहेत. झिकाच्या या २७ पैकी २३ रुग्णांवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले. तर ४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून, तीन रुग्ण अद्याप ॲडमिट आहेत. दवाखान्यांतर्गत ३ हजार ४९७ गराेदर माता असून, उद्रेकग्रस्त भागातील गराेदर मातांची संख्या २८६ आहे.
आतापर्यंत १ लाख २४ हजार लाेकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, तर उद्रेकग्रस्त भागात ७१ हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. उद्रेकग्रस्त भागात डासांसाठी फवारणी, अळी सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या भागात डासांची उत्पत्ती हाेऊ देऊ नये. - डाॅ. सूर्यकांत देवकर, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा