बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या एमडींसह चार अधिकाऱ्यांना झाली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:43 AM2018-06-21T06:43:04+5:302018-06-21T06:43:04+5:30
आर्थिक गुन्हे शाखेने बॅँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार उच्चस्तरीय अधिकारी आणि डीएसके समूहाशी संबंधित दोघे अधिकारी अशा सहा जणांना बुधवारी अटक केली.
पुणे : अधिकारांचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्या प्रकरणी, आर्थिक गुन्हे शाखेने बॅँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार उच्चस्तरीय अधिकारी आणि डीएसके समूहाशी संबंधित दोघे अधिकारी अशा सहा जणांना बुधवारी अटक केली.
बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद), तसेच डीएसके यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुनील घाटपांडे, डीएसके ग्रुपचे इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर यांना अटक केली आहे. विशेष न्यायाधीश एन. ए. सरदेसाई यांनी त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पहिल्यांदाच राज्यातील बँकेवर अशा प्रकारे कारवाई होत आहे.
गुप्ता, मुहनोत व देशपांडे यांनी अधिकाराचा गैरवापर करून डीएसके यांना ड्रीमसिटी प्रकल्पासाठी १०० कोटींचे कर्ज मंजूर केले. सर्व बँकांची संमती नसतानाही ठराव पारित करून, मूळ कर्ज मंजुरी ठरावात बदल करून ५० कोटी कर्जाच्या नावाखाली देण्याचा निर्णय घेतला. संबंधित निधी प्रकल्पावर खर्च झाला का, हेही आरोपींनी पाहिले नाही. यात प्र्रक्रियेत रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. र
बँक आॅफ महाराष्ट्राच्या बाजीराव रस्त्यावरील शाखेत डीएसकेंचे तब्बल
१ हजार २२० धनादेश वटले नव्हते.
याचाही विचार कर्जप्रकरण स्थगित करण्यासाठी केला नाही. डीएसकेडीएलच्या २५९ कर्मचाºयांनी दिलेला राजीनामा, कंपनीतील कर्मचाºयांचे वेतन न देणे अशा अनेक गोष्टी मराठे, गुप्ता, देशपांडे यांनी लक्षात घेतल्या नाहीत.
>सीएवर ठपका
सीए घाटपांडे यांनी २००७-०८ ते २०१६ पर्यंतच्या लेखापरीक्षणात डीएसकेडीएल कंपनीची परिस्थिती नमूद केली नाही. बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आॅफ इंडिया, विजया बँक, सिंडीकेट बँक, युनियन बँक, आयडीबीआय व इतर बँकांनी दिलेले कर्ज विनियोग दाखले खोटे असून, ते घाटपांडे यांनी केल्याचे आणि त्यासाठी आरोपींनी कट केल्याचे पोलिसांनी सांगितले.
>आर्थिक परिस्थिती हलाखीची
असल्याने डीएसके यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक होते. मात्र, गुप्ता व मराठे यांनी १० कोटी रुपयांचे कर्ज डीएसकेडीएलला १२ एप्रिल २०१७ रोजी मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
>‘स्पा’वर १३ लाख खर्च
बँक आॅफ महाराष्ट्राने दिलेली रक्कम ड्रीम सीटीसाठी असताना, त्यांनी हे पैसे गुंतवणूकदारांचे व्याज देण्यासाठी व
घरगुती खर्चासाठी वापरले.
तब्बल १३ लाख रुपये ‘स्पा’साठी खर्च केल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप चव्हाण यांनी न्यायालयात सांगितले.
दुधासाठी २२ हजार, ३९ हजार रुपयांचे शूज, २७ हजार रुपयांचे तांदूळ व तेल आणि ८८ हजार रुपये कपडे शिवण्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे.