पुण्यातील चौघे ताब्यात
By admin | Published: March 30, 2015 12:08 AM2015-03-30T00:08:50+5:302015-03-30T00:11:50+5:30
मिरज दरोडा प्रकरण : धागेदोरे सापडले; परिचिताकडून टीप देऊन लुटीचा प्रकार
मिरज : मिरजेत धान्य व रॉकेल विक्रेते अभिजित ऊर्फ आबा जाधव यांच्या घरावर दरोडा टाकून १२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या तोतया प्राप्तिकर व पोलीस अधिकाऱ्यांच्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुणे व परिसरातील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अभिजित जाधव यांच्या एका परिचिताने टीप देऊन लुटीचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सात ते आठजणांच्या टोळीने प्राप्तिकर व पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून शुक्रवारी रात्री आबा जाधव यांच्या कुटुंबीयांना कारवाईची धमकी व मारहाण करून घरातील बारा लाखांचे दागिने व रोख रक्कम लुटली. तोतया अधिकाऱ्यांनी भरवस्तीत जाधव कुटुंबीयांना मारहाण करून दरोडा टाकल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती.
शहर पोलिसांसह गुंडाविरोधी पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक चोरीच्या तपासासाठी कामाला लागले आहे. चोरटे घेऊन गेलेले जाधव कुटुंबीयांचे मोबाईल व वाहन क्रमांकावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पुणे व परिसरातील चार संशयित मिरजेतील दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. पथकाने तातडीने हालचाल करून संबंधित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. आबा जाधव यांच्या एका परिचिताकडून टीप घेऊन दरोड्याचा प्रकार केल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती मिळाली. टोळीतील अन्य सदस्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (वार्ताहर)
संशयित आरोपींची कसून चौकशी
जिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा घडल्यानंतर २४ तासांत संशयितांचा शोध लागल्याने दरोडेखोरांच्या टोळीतील इतर सदस्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जाधव कुटुंबीयांच्या माहितीनुसार पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी चक्रे फिरविल्यामुळे संशयित टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ताब्यात घेतलेल्या चौघांची चौकशी सुरू असून, चौकशीनंतर त्यांना गुन्हा करण्यास कोणी मदत केली, माहिती दिली, हे स्पष्ट होणार आहे.