घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा, तिघांना अटक
By नितीश गोवंडे | Published: April 5, 2024 02:57 PM2024-04-05T14:57:42+5:302024-04-05T14:57:57+5:30
खोट्या सह्या केलेल्या कॅश व्हाऊचरवर २० लाख रुपये रोखीने देऊन घर घेतल्याची कागदपत्रे तयार केली
पुणे: बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घर नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार मे २०२२ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत धनकवडी मधील हत्ती चौकातील चाळ नंबर सी/६/१४ येथे घडला आहे.
याबाबत तानाजी नामदेव पांगारे (७६, रा. चाळ नंबर सी/६/१४, हत्ती चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अंबादास सुर्यवंशी, नरसिंह सुर्यवंशी (दोघे रा. मार्केट यार्ड रोड, आंबेडकर नगर), प्रभाकर इंगळे (रा. गोखलेनगर, लाल चाळ, पुणे) यांना अटक केली आहे. तर मुकेश जाधव (रा. आंबेडकर नगर) याच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंबादास याने फिर्यादी पांगारे यांचे धनकवडी येथे असलेल्या घराचे कुलमुखत्यारपत्र भाऊ नरसिंह याच्या नावाने तयार करुन घेतले. यावर मुकेश जाधव व प्रभाकर इंगळे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. आरोपींनी संगनमत करुन कुलमुखत्यारपत्रावर तानाजी पांगारे यांचा फोटो लावून खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून घेतले. तसेच त्यावर पांगारे यांची खोटी सही व अंगठा उठवला. फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केलेल्या कॅश व्हाऊचरवर २० लाख रुपये रोखीने देऊन घर घेतल्याची कागदपत्रे तयार केली. आरोपींनी घर नावावर करुन घेतल्याचे पांगारे यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे करत आहेत.