येरवड्यातील संदीप देवकर खूनप्रकरणी चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 01:42 AM2019-01-11T01:42:51+5:302019-01-11T01:43:06+5:30
हातगाडी लावण्याचा वाद : खुनाचा मुख्य सूत्रधार अजूनही फरार
विमाननगर : हातगाडी लावण्याच्या वादातून येरवड्यात झालेल्या खूनप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुरुवारी चौघांना अटक केली. संदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर (वय ४९, रा. नवी खडकी येरवडा) यांचा रविवारी (दि. ५) रोजी डोक्यात रिव्हॉलवरने गोळ्या घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात गणेश शांताराम चौगुले ऊर्फ बोरकर (वय २४, सुभाषनगर येरवडा), विशाल नागनाथ कांबळे (वय २२, लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित प्रकाश कोळी (वय २६, रा. गणेशनगर येरवडा), मयूर सुनील सूर्यवंशी (वय २५, रा. रविवारपेठ पुणे) या चौघांना पुणे स्टेशन परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सय्यद व ओरोपी अशरफ पठाण हे दोघे अद्यापही फरार आहेत.
हातगाडी लावण्याच्या वादातून शनिवारी संदीप देवकर यांना गणेश चौगुले व जावेद सय्यद यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी (दि. ६) संदीप देवकर यांचा गणेश चौगुले व त्याच्या साथीदारांनी निर्घृण खून केला. या खुनामुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली होती. खुनाचा गंभीर गुन्हा करून सर्व आरोपी फरार झाले होते. येरवड्यासह गुन्हे शाखेची पथके गुन्ह्याचा तपास करीत होती. पुणे शहरासह मुंबई व इतर ठिकाणी तपासासाठी पथके तैनात करण्यात आली होती. गुन्ह्यातील आरोपी गणेश चौगुले हा पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गणेशसह विशाल कांबळे, रोहित कोळी,
मयूर सूर्यवंशी या चौघांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपासात हा खुनाचा गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली.
अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सहायक फौजदार बाळू बहिरट, पोलीस हावालदार अजिज बेग, हनमंत जाधव, संदीप मांजूळकर, पोलीस कर्मचारी सचिन रणदिवे, मनोज कुदळे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, पंकज मुसळे, सचिन पाटील, सुनील सकट, विष्णू सरवदे, सुनील नागलोत, समीर भोरडे, अजय पडोळे, राहुल परदेशी यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.
तब्बल चार दिवसांनंतर या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात येरवडा पोलिसांना यश आले. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह इतर फरार आरोपींचा कसून तपास सुरूअसून, लवकरच फरार आरोपी देखील जेरबंद करण्यात येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.