नीरा डावा कालव्याची चार आवर्तने
By admin | Published: December 31, 2016 05:27 AM2016-12-31T05:27:10+5:302016-12-31T05:27:10+5:30
नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये रब्बी हंगामामध्ये २ आवर्तनांसाठी ७.५९ टीएमसी, तर उन्हाळी हंगामामध्ये २ आवर्तनासाठी ७.३० टीएमसी पाणीवापर करण्याचा
इंदापूर : नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये रब्बी हंगामामध्ये २ आवर्तनांसाठी ७.५९ टीएमसी, तर उन्हाळी हंगामामध्ये २ आवर्तनासाठी ७.३० टीएमसी पाणीवापर करण्याचा निर्णय नीरा डावा कालव्याच्या सल्लागार समितीची रब्बी हंगामाच्या बैठकीत घेण्यात आला.
रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन दि. ५ जानेवारी २०१७ पासून सुरु करण्याचे या बैठकीत ठरले आहे. उन्हाळी हंगामातील सिंचन व्यवस्थापनाचे नियोजन करण्यासाठी दि. २५ फेब्रुवारी २०१७ रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याचे ठरले, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
ते म्हणाले, की पुण्यातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात गुरुवारी (दि. २९) जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे पाटबंधारे मंडळ, पुण्याचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा
परिषद, कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक विकास महामंडळ यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
भाटघर, वीर व नीरा देवधर या धरणांमध्ये या वर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.
बाष्पीभवन व इतर व्यय वजा जाता उर्वरित राहिलेल्या पाणीसाठ्यापैकी नीरा उजव्या कालव्यासाठी २२.४३ टीएमसी तर नीरा डावा कालव्यासाठी १४.९० टीएमसी पाण्याचे सन २०१६-१७ या सिंचन वर्षात नियोजन या बैठकीत करण्यात आले. (वार्ताहर)
- या बैठकीदरम्यान खडकवासला प्रणाली व नीरा प्रणालीच्या कालवा सल्लागार समितीच्या एकत्रित बैठका आयोजित करणे, नीरा देवधर प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी त्या प्रकल्पाचे कालवे प्रणाली विकसित होईपर्यंतच नीरा प्रणालीस मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात नीरा प्रणालीमध्ये पाणीटंचाई जाणवू शकते. त्या अनुषंगाने कालव्याऐवजी पाईपलाईन, लाभक्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, सणसर कटद्वारे खडकवासला प्रणालीतून इंदापूर तालुक्यास पाणी उपलब्ध करावे. पाणीपट्टी वसुलीसाठी साखर कारखान्यांनी सहकार्य करावे, सिंचन व्यवस्थापनामध्ये पाणी वापर संस्थांना सक्षम करावे, या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.