तीस वर्षांपासून दुरावलेले चार भावंडे भेटले योगायोगाने एकाच गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:37 PM2018-09-14T18:37:48+5:302018-09-14T18:38:50+5:30
उदरनिर्वाहासाठी पायांना भिंगरी लावून गावोगावी भटकणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाला सोशलमीडियाविषयी ना आनंद आणि दु:ख...
वालचंदनगर : सोशल मीडियामुळे हल्ली संपूर्ण जग एका क्लिकवर आल्याचे बोलले जाते. याच सोशलमीडियावर पााहिजे ती गोष्टी शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. यातल्या बऱ्याच गोष्टी हाताशी लागतात. काही सापडतात तर काही तशाच कायम तपासावर शिक्का घेवून अनुत्तरीत राहतात. पण उदरनिर्वाहासाठी पायांना भिंगरी लावून गावोगावी भटकणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाला सोशलमीडियाविषयी ना आनंद आणि दु:ख... अशाच दुर्लक्षित घटकातील घिसाडी समाजातल्या एका कुटुंबातील तीस वर्षांपासून दुरावलेले चार भावंडे योगायोगाने इंदापूर तालुक्यातील एका गावात परत भेटले. त्यावेळी त्या भावडांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
जांब ता. इंदापूर येथे हा प्रसंग घडला. रामा, भीवा, राघु,सोमा घिसाडी आपल्या आईवडिलांचा पारंपारिक घिसाडी व्यवसाय करून गेल्या ३० वर्षांपासून हे ४ भावंडे एकमेकांपासून दुरावले होते. दरवर्षी त्यांचे गाव ठरलेले असल्यामुळे मजल दरमजल करत आपली उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करताना एका कुटुंबाचे आगमन इंदापूर तालुक्यातील जांब या गावात झाले होते. थोरला भाऊ त्याच दिवशी रणगाव येथील काम उरकून बारामतीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला घिसाडी आलेले दिसले. त्याने आपला घोड्याचा गाडा जागेवर थांबून पाहिले तेव्हा सख्खा भाऊ समजले. त्यानंतर दोन दिवसांनी या कुटुंबाचा मुक्काम वाढला आणि आणखी दोन भावांचे कुटुंब त्या गावात दाखल झाले. चारही भाऊ आपआपल्या बायका पोरां संसारासह एकमेकांना त्याक्षणी भेटले. त्यामुळे चार भावंडाचा संसार प्रत्यक्षात पाहावयास मिळाले त्यावेळी मिळकत व परिस्थितीपेक्षा एकमेकांच्या चौकशीत मग्न होते. एक घोडा गाडीचे चार गाड्या झाल्या हेच त्यांच्या कुटूंबाची एकत्रित संपत्ती दिसून आल्याने रामा, भीवा, सोमाच्या चेहऱ्यावर आनंदच ही आनंद दिसत होता. पुन्हा चारही घोडा गाड्या एकत्रितपणे पोटापाण्यासाठी दुसऱ्या गावाला धुराळा उडत दौडू लागल्या..
-------