पिंपळवंडीत एटीएमसह चार दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:16+5:302021-05-08T04:11:16+5:30
वडगाव कांदळी : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे बुधवारी (दि. ५) मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी ...
वडगाव कांदळी : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे बुधवारी (दि. ५) मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी पिंपळवंडी येथील बॅक आँफ महाराष्ट्रचे एटीएम मशिन व चार दुकाने फोडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी पिंपळवंडी येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्यामुळे चोरट्यांचा हाताला फारसे काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी पिंपळवंडी स्टँड येथे चार दुकानांचे शटर उचकटून चोरी केली. त्यांनी भारत लेंडे यांच्या लक्ष्मी खानावळ या हाॅटेलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व हाॅटेलमधील किरकोळ चिल्लर व शीतपेयाच्या बाटल्या चोरी केल्या. बाजूला असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. त्यानंतर या चोरट्यांनी या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या गडगे फिटर यांचे स्वामी समर्थ इलेक्ट्रिकल्स या मोटारवायडिंग दुकानाचे शटर उचकटून चोरी केली.
बाळासाहेब काकडे यांच्या अस्मिता किराणा या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील काही रक्कम चोरून नेली. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीची फिर्याद बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक नितीन वाणे यांनी दिली असून, पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.