चार तालुक्यांना मिळणार नव्या प्रशासकीय इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:58+5:302021-08-12T04:15:58+5:30
पुणे : जिल्ह्यातील खेड, भोर, वेल्हा आणि वडगाव मावळ या चार तालुक्यांत लवकरच प्रशस्त, भव्य अशा नवीन प्रशासकीय इमारती ...
पुणे : जिल्ह्यातील खेड, भोर, वेल्हा आणि वडगाव मावळ या चार तालुक्यांत लवकरच प्रशस्त, भव्य अशा नवीन प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने प्रत्येकी सुमारे २० ते २१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे बांधकाम करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात बारामती तालुक्यात सर्व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले. याच धर्तीवर अन्य तालुक्यांतही इमारतींचे बांधकाम होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांत आजही अत्यंत जुन्या, अपुऱ्या जागेत, पुरेसा सूर्यप्रकाश किंवा हवा खेळती राहण्यासाठीही जागा नसलेली कार्यालये आहेत. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढल्याने सरकारी कार्यालयांचे कामकाज खूप वाढले असून, दररोज कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय महसूल विभागाचीच कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना अडचणी येतात. याचमुळे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र प्रशासकीय इमारती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चालू आर्थिक वर्षांत खेड, भोर, वेल्हा आणि वडगाव मावळ येथे नवीन प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक प्रशासकीय इमारतीसाठी २० ते २१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पुणे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी ही माहिती दिली.
--------
अखेर खेड, भोर, वेल्ह्यातील जागांचा वाद मिटला
खेड तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेवरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगलाच वाद पेटला होता. विद्यमान आमदार विरोधी माजी आमदार या वादात निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पडूनही इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर आमदार दिलीप मोहितेंनी पुढाकार घेऊन जागेचा विषय मार्गी लावला असून, आता लवकरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल. तसेच भोर आणि वेल्हा तालुक्यातही जागेच्या प्रश्नावरून इमारतींचे बांधकाम रखडले होते. आता हा प्रश्नही मार्गी लागला आहे.
------