डीएसकेंच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 08:27 PM2018-02-16T20:27:09+5:302018-02-16T20:27:32+5:30
ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्याची पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी डीएसके दाम्पत्याच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत.
पुणे - ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्याची पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी डीएसके दाम्पत्याच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आॅक्टोंबर २०१७ मध्ये डिएसके यांच्यासह पत्नी, हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ उच्च न्यायालयाने डीएसके यांचे अटकेचे संरक्षण काढून घेतल्याने पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त निलेश मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली चार पथके स्थापन केली आहेत. डीएसके यांच्या अटकेसाठी ही पथके रवाना करण्यात आली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे ४ हजार २० ठेवीदारांनी तक्रारी केल्या असून त्यांच्या ठेवीची रक्कम २८० कोटी ५८ लाख ५६ हजार ५८८ रुपये इतकी आहे़ त्यांच्या मालमत्तांची यादी पोलिसांनी एक महिन्यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना दिली असून त्यावर महसुल विभागाकडून पुढील कारवाई सुरु आहे.
याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाने त्यांना ५० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. परंतु, पैसे भरण्यास कुलकर्णी यांना अपयश आले आहे़ त्यामुळे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी त्यांना पाच दिवस हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. कुलकर्णी यांनी बुलडाणा अर्बन बँकेकडून मिळणाºया कर्जाचा हवाला देत न्यायालयाकडून १३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत घेतली होती. मात्र, बुलडाणा बँकेला दिल्या जाणाºया मालमत्ता डीएसके यांनी आधीच एका बँकेकडे तारण म्हणून ठेवल्या असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने शुक्रवारी डीएसके यांना अटक करण्याची मुभा पोलिसांना दिली.