विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरणारे चौघे अटकेत, साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:20 AM2017-09-08T02:20:13+5:302017-09-08T02:20:30+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून यातील दोघे जण चोरीच्या उद्देशानेच पुण्यात विसर्जन मिरवणुकीत आले होते. फरासखाना आणि विश्रामबाग पोलिसांनी या चौघांकडून आतापर्यंत दोन लाख रुपयांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत.
शेहबाज सैय्यद अली सैय्यद अहमद अली (वय २२, रा. हिंगणघाट, जि. वर्धा), विशाल चव्हाण, फग्गीर मोहम्मद अहमद शेख (वय ३५, रा. चित्ताह कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई), बशीर निसार शेख (वय २३, रा. आझादनगर वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चोरलेल्या अनेक मोबाइलमधील सिमकार्ड हे फेकून दिले होते. तर, काही सिमकार्ड त्यामध्येच होते. सैय्यद अली याच्याकडून फरासखाना पोलिसांनी ९५ हजारांचे दहा मोबाइल जप्त केले आहेत. त्याच्याविरोधात फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विश्रामबाग पोलिसांनी विशाल चव्हाण याच्याकडून १० हजाराचा एक, फग्गीर शेखकडून २० हजारांचे दोन, तर, बशीर शेख याच्याकडून सुमारे ८० हजारांचे ७ मोबाइल हस्तगत केले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात आतापर्यंत सुमारे एक हजार तर, फरासखाना पोलीस ठाण्यात २०० ते ३०० आॅनलाईन तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामध्ये युवक युवतींचे मोबाइल लांबवल्याचे प्रकार अधिक आहेत. दगडूशेठ गणपती मंडप, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, उंबºया गणपती चौक, लोकमान्य टिळक चौक, कुंटे चौक या गर्दीच्या भागामध्ये आरोपींनी नागरिकांचे मोबाइल लंपास केले होते. मोबाइल लंपास झाल्यानंतर अनेकांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. पोलिसांकडे दाखल असणाºया तक्रारींची तपासणी सुरू असून आतापर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक मोबाइल मालकांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. तर, अन्य मोबाइल मालकांचा शोध सुरू आहे. ज्या नागरिकांचे मोबाइल विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरीला गेले असतील त्यांनी मोबाइलची कागदपत्रे घेऊन विश्रामबाग आणि फरासखाना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.