शाळांसाठी साडेचार हजार अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:29 AM2019-03-16T01:29:15+5:302019-03-16T01:29:31+5:30
आंतरराष्ट्रीय मंडळाच्या निवड अंतिम टप्प्यात; शैक्षणिक प्रयोग करण्याची मिळणार मुभा
पुणे : प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता देण्यासाठी राज्यभरातून साडेचार हजार अर्ज आले होते. त्यातून आता १०० शाळांची निवड केली जाणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली निवडीची ही प्रक्रिया अखेर मार्गी लागली असून येत्या आठवडाभरात शाळांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनाव्यात या हेतूने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळालेल्या शाळांमध्ये वेगळी अभ्यासपद्धती, मूल्यमापनपद्धती राबविली जाणार आहे. या शाळांमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. यानुसार या शिक्षण मंडळाची संलग्नता मिळविण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले. त्यानुसार शाळांनी या मंडळाची संलग्नता मिळविण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळा, अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्वांना यासाठी अर्ज करता येणार होते. त्याला राज्यभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला, ४ हजार ९५५ शाळांनी अर्ज केले. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ३३२ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वांत कमी ३४ शाळांनी अर्ज केले आहेत.
शाळांचे नेतृत्त्व, तिथल्या शिक्षकांची गुणवत्ता, शाळेचे ध्येय, शाळेला मिळत असलेली प्रशासकीय मदत आदी बाबींचा विचार करून प्राथमिक यादीमध्ये ४५५ शाळांची निवड करण्यात आली. या ४५५ शाळांना भेटी देणे, तिथल्या सुविधांची पाहणी करणे आदी कामे समितीमार्फत पार पाडण्यात आली. या समितीमध्ये शासन, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला होता. त्यांच्याकडून शाळांची काटेकोर तपासणी करून निवडण्यात आलेल्या शाळांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात
शाळांची निवड झाल्यानंतर लगेच मे महिन्यात तिथल्या शिक्षकांचे निवासी शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ कसे कार्यरत राहील, त्याचा अभ्यासक्रम कसा असेल, शिक्षकांकडून काय अपेक्षा असतील, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०१९) लगेच शाळांची सुरुवात होईल.
प्राथमिक शाळांची निवड... आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळासाठी पहिल्या टप्प्यात १ ली ते ५ वी पर्यंतच्या प्राथमिक शाळांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील इयत्ता वाढविल्या जाणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सुरुवातीचे प्रयोग हे प्राथमिक शिक्षणाबाबत केले जाणार आहेत.