संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांसाठी चार हजार खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:45+5:302021-06-16T04:15:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. लहान मुलांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांत सुमारे चार हजार खाटा मुलांसाठी आरक्षित केल्या आहेत.
जिल्हा कृती दलाने तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली. त्यात दलाच्या सदस्य डॉ. आरती किणीकर, पिंपरी चिंचवड महापालिकचे आयुक्त राजेश पाटील, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, राज्य वैद्यकीय विभागाचे डॉ. प्रदीप आवटे, डॉ. आनंद पंडित, डॉ. संजय नातू, उपजिल्हाधिकारी संतोष पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.
“मुलांवरील उपचारांसाठी पाच झोन करण्यात आले आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे दहा हजार खाटा आहेत. त्यापैकी सुमारे एक हजार खाटा या लहान मुलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे दीड हजार खाटा राखीव ठेवल्या आहेत,” असे रुबल अगरवाल यांनी सांगितले.
“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार ८०० खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत,” असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. डॉ. किणीकर म्हणाल्या, “लहान मुलांना मास्क घातल्याने भीती वाटते. विशेष मुलांना संवाद साधताना ओठांच्या हालचाली समजत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी विशिष्ट बनावटीचे मास्क तयार करण्याच्या सूचना आल्या होत्या. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तयार करून ते विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील संस्थेकडे पाठविण्यात आले होते. त्यांनी ओठांचा भाग प्लॉस्टिकचा आणि उर्वरित भाग कापडी अशा मास्कला सहमती दर्शविली आहे. लहान मुलांसाठी या मास्कचा वापर करता येणार आहे.”
चौकट
लहान मुलांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन
लहान मुलांच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन पालकांसाठी ‘चाइल्ड हेल्पलाइन’ सुरू केली जाणार आहे. प्रबोधनात्मक संदेश तयार करून नागरिकांना माहिती देणार असल्याचे चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
चौकट
सिरो सर्वेक्षण नाही
“कोरोनाबाबतचे यापूर्वी सिरो सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, लहान मुलांसाठी सिरो सर्वेक्षण करण्याच्या सूचना कृती दलाने दिलेल्या नाहीत,” असे डॉ. किणीकर यांनी स्पष्ट केले.