पुणे जिल्ह्यात साडे चार हजार बालके व्याधिग्रस्त; आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:20 PM2021-12-29T20:20:23+5:302021-12-29T20:20:31+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून (आरबीएसके) मोहिमेत या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे.
पुणे : जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात केलेल्या लहान मुलांच्या तपासणी व सर्वेक्षणात जिल्ह्यात तब्बल 4 हजार 768 मुले विविध व्याधिग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून (आरबीएसके) मोहिमेत या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शंभर टक्के लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरबीएसके कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 3 लाख 35 हजार बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यातील आत्तापर्यंत 2 लाख 31 हजार 195 बालकांची तपासणी पूर्ण झाली. या बालकांची संपूर्ण माहिती चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टिममध्ये नोंदविली जात आहे. यात 4 हजार 768 बालकांना विविध आजार असल्याची माहिती समोर आली. त्यात 233 बालकांना जन्मजात व्यंग असून, कान-नाक-घशाचे आजार असलेल्या बालकांची संख्या दोन हजार 21 आहे. विविध आजारांचे एकूण चार हजार 768 मुले आढळली आहेत.
अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे काही प्रमाणात खंड पडला होता. आता पुन्हा एकदा मोहीम स्वरूपात आरोग्य तपासणी केली जात आहे. बालकांना अंगणवाडी केंद्रांतील ताई आणि अशा वर्कर यांच्यावर बालकांना आणून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत शालेय विद्यार्थी आणि बालकांच्या आरोग्य तपासणीत कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयाला छिद्र असलेल्या मुलांवर (सीएचडी, व्हिएसडी) मुंबईत उपचार केले जाणार आहे. तसेच इतर आजाराचे निदान झाल्यास त्याचे संपूर्ण उपचार पुणे जिल्ह्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालये निश्चित करण्यात आली. त्याठिकाणी उपचार केले जाणार आहे. जन्मजात व्यंग असलेले 233, बालकांचे आजार 325, कमकुवत एक हजार 345, कान-नाक-घशाचे आजार असलेल्या बालकांची संख्या दोन हजार 21, डोळ्यांचे आजार 1290 बालकांना असून, 554 जणांना त्वचा विकार असल्याची माहिती आतापर्यंच्या पहाणीतून समोर आली आहे.
कुपोषण मुक्तीसाठी विशेष मोहिम
''राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यातून आजारी आढळत असलेल्या बालकांना आवश्यक ते उपचार आणि पोषण पुरविण्यात येणार आहे. उर्वरित बालकांचे तपासणी केली जात असून, सर्व बालकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांचे विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे असे पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी संगीतले.''