Pune Crime: पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटविली चार वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:20 PM2022-01-04T14:20:21+5:302022-01-04T14:25:24+5:30
चिखली पोलीस ठाणे येथे ही घटना घडली
पिंपरी : पोलीस महिलेची एका तरुणाने पोलीस ठाण्यात वाट अडवून सरकारी कामात अडथळा केला. तसेच पोलीस महिलेच्या दुचाकीसह चार वाहनांना आग लावून त्यांचे नुकसान देखील केले. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चिखली पोलीस ठाणे येथे ही घटना घडली.
निखिल दत्तात्रय कंगणे (वय २२), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी रेखा गायकवाड यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल हा फिरस्ता आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने फिर्यादी महिला पोलीस ठाण्यात ड्युटीवर जात असताना पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांची वाट अडवली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी व पोलिसांना शिवीगाळ केली.
चिखली पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना रविवारी (दि. २) रात्री एकच्या सुमारास आरोपीने आग लावली. यात पोलिसांनी जप्त केलेली वाहने तसेच फिर्यादी महिला पोलीस यांची दुचाकी अशी चार वाहनांचे नुकसान झाले. तसेच इतर वाहनांचे कुशन फाडून आरोपीने नुकसान केले. पार्किंगमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पोलीस ठाण्याच्या खिडक्यांवर दगड मारून आरोपीने काचा फोडल्या.