Pune Crime | वर्चस्ववादातून चौघांवर काेयत्याने वार; मीनाताई ठाकरे वसाहतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:10 AM2023-02-28T10:10:56+5:302023-02-28T10:11:56+5:30
ही घटना मीनाताई ठाकरे वसाहतीतील क्रिसेंट हायस्कूल परिसरात रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली...
पुणे : वर्चस्ववादाच्या संघर्षातून सराईत गुन्हेगारांच्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने काेयत्यासह कुऱ्हाड, पालघनसारख्या हत्यारांनी चौघांवर वार केला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, एक १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी आहे. ही घटना मीनाताई ठाकरे वसाहतीतील क्रिसेंट हायस्कूल परिसरात रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली.
या घटनेत प्रकाश तुळशीराम पवार (वय १९, रा. मीनाताई ठाकरे वसाहत) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सूर्या ऊर्फ सूरज ताज मोहम्मद सिद्दीकी, राकेश ऊर्फ लल्लु रतन सरोदे, आदित्य साखरे हे जखमी झाले आहेत. याबाबत प्रकाश पवार याचा भाऊ आकाश पवार (वय २८, रा. हडपसर) याने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बालाजी उमाप, अजय डिकळे, रोहित जाधव, यश माने, राजा मॅडम या ५ जणांना अटक केली आहे. तर सचिन माने याच्यासह इतर ५ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर हल्ला करणारे आरोपीही रेकॉर्डवरील आहेत. सचिन माने हा मुख्य गुन्हेगार असून, त्याच्यावर २०२० तडीपार तसेच मार्केटयार्ड पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली होती. प्रकाश पवार आणि त्याचे मित्र येथील गीतांजली अपार्टमेंटच्या समोर रविवारी रात्री उभे होते. त्यावेळी सचिन माने आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी गाड्यांची तोडफोड करत सूरज आणि राकेश सरोदे यांना वार करून जखमी केले.
पूर्ववैमनस्य ठरले कारण
खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला एक आरोपी रविवारी वडिलांच्या दशक्रियेविधीसाठी बाहेर आला होता. त्याला भेटण्यासाठी इतरांबरोबर फिर्यादीचा भाऊ प्रकाशही गेला होता. संबंधित आरोपी व बालाजी उमाप यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. त्याच कारणातून सचिन माने, बालाजी उमाप, अजय डिकळे व साथीदारांनी गल्लीमध्ये दहशत निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.