Accident: चारचाकी वाहन पायी चालणाऱ्या कुटुंबाला धडकले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, आई - वडील जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:25 AM2021-12-10T10:25:58+5:302021-12-10T10:26:10+5:30
अपघातानंतर चारचाकी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने पती-पत्नी जखमी झाले. तर त्यांच्या सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. काळेवाडी फाटा येथे बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले. याप्रकरणी कनवरलाल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनवरलाल त्यांची पत्नी आणि मुलगा संघर्ष असे तिघेजण काळेवाडी फाटा येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी पुण्याकडून सेवा रस्त्याने भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने कनवरलाल, त्यांची पत्नी आणि मुलाला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात कनवरलाल आणि त्यांची पत्नी जखमी झाले. त्यांचा मुलगा संघर्ष गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला.