Pune Crime| विश्रांतवाडीतील दोन किलो सोने दागिन्यांच्या चोरी प्रकरणी चार कामगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:52 PM2022-02-02T16:52:34+5:302022-02-02T17:18:33+5:30
चोरी केलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 56 लाख रुपयांचे दागिने पोलिसांकडून हस्तगत
येरवडा: धानोरी येथील सोनाराच्या घरातून चोरी केलेल्या अंदाजे 85 लाख रुपये किमतीच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगारांसह चार आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. याप्रकरणी मुकेश गोमाराम चौधरी (वय 22), रमेश रामलाल चौधरी (वय 27), भगाराम गोमाराम चौधरी (वय 38), जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय 38, सर्वजण रा. खुडाला-बाली, पाली, राजस्थान) सर्वांना अटक करण्यात आली आहे. या सोने चोरीच्या गंभीर गुन्ह्यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरी केलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 56 लाख रुपये किमतीचे एक किलो 406 ग्राम सोन्याचे दागिने विश्रांतवाडी पोलिसांनी तपासात आरोपींकडून हस्तगत केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी भैरवनगर येथील सोनाराच्या घरातून 10 जानेवारी रोजी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे दोन किलो 81 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, प्रफुल मोरे, संदीप देवकाते, शेखर खराडे यांनी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक तपासानुसार काही संशयित इसम हे मागील काही दिवसांपासून तक्रारदार यांच्या घराच्या परिसरात रेकी करत असताना दिसून आले.
यामधील तक्रारदार यांच्या दुकानात काम करणारा मुकेश चौधरी हा सुट्टीसाठी त्याच्या मूळ गावी राजस्थान येथे गेला असल्याबाबतची देखील माहिती मिळाली होती. गुन्ह्याच्या अधिक तपासात मुकेश यानेच त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने हा गंभीर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सतत तेरा दिवस केलेल्या तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एकूण चार आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला त्यांच्या मूळ गावी खुडाला, ता. बाली, जिल्हा पाली, राजस्थान इथून ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यातील सुमारे 56 लाख 27 हजार रुपये किमतीचे एक किलो 406 ग्रॅम 940 मिली ग्राम सोन्याचे दागिने आरोपींकडून शिताफीने हस्तगत करण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक लहू सातपुते, पोलीस हवालदार विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किरवे, पोलीस अंमलदार संदीप देवकाते, प्रफुल मोरे, शेखर खराडे, योगेश चांगण, शिवाजी गोपनर, तांत्रिक विश्लेषण विभाग परिमंडळ चारचे पोलीस अंमलदार श्याम शिंदे, विशेष पोलीस अधिकारी राज राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.