स्वारगेट परिसरातून चार वर्षांच्या मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:30+5:302021-06-05T04:09:30+5:30
-- सासवड : पुण्यातील स्वारगेट येथील घोरपडी पेठसारख्या गजबजलेल्या परिसरातून चार वर्षांच्या चिमुकलीचे गुरुवारी मध्यरात्री अपहरण झाले होते. ...
--
सासवड : पुण्यातील स्वारगेट येथील घोरपडी पेठसारख्या गजबजलेल्या परिसरातून चार वर्षांच्या चिमुकलीचे गुरुवारी मध्यरात्री अपहरण झाले होते. त्या मुलीची विक्री करण्यासाठी तिला घेऊन निघालेल्या आरोपीला पोलिसांनी तेरा तासांतच मोठ्या शिताफीने शोधले व सासवड येथील बसस्थानकावर ताब्यात घेतले व मुलीला तिच्या पालकांकडे सुखरूप पोहोचवले.
विलास कांबळे (मूळ राहणार परभणी, सध्या कात्रज) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वारगेट परिसरातील घोरपडी पेठेत राहणाऱ्या प्रिती राजू जाधव (वय ४) या बालिकेस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीचे वर्णन असलेले छायाचित्र सर्व पोलीस ठाण्यांना पाठविले व सोशल मीडियावरून ही माहिती फोटो प्रसारित करून संबंधित वर्णनाची मुलगी कुठे आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. तसेच संपर्क नंबर दिले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास संबंधित वर्णनाची मुलगी एका व्यक्तीसोबत सासवड तालुका पुरंदर येथील पीएमटी बसस्टॉपवर असल्याची माहिती एका स्थानिक व्यक्तीने स्वारगेट पोलिसांना कळविली. स्वारगेट पोलिसांनी याबाबत सासवड पोलिसांना त्वरित माहिती दिली. ही माहिती मिळताच सासवड पोलिसांनी बसस्टॉपवर जाऊन त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केल्यावर त्या मुलीचे पुण्यातून अपहरण केल्याची कबुली दिली व तिची विक्री करण्यासाठी तिला घेऊन निघाला असल्याची धक्कादायक माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व मुलीला स्वारगेटला पाठवून पालकांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नीलेश जाधव यांनी केली.
--
चौकट
सोशल मीडियामुळे तातडीने तेरा तासांत शोध
अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाइकांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरविले. त्या मुलीचे फोटो सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून गुन्ह्याची माहिती दिली. दुसरीकडे पोलिसांच्या विविध यंत्रणेमार्फत मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. तो फोटो सासवड येथील एका नागरिकाच्या व्हाॅट्सअॅपवर आला होता. त्या व्हाॅट्सअॅप पोस्टमधील फोटोतील वर्णनाची मुलगी आणि तिला घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीला शंका आल्याने त्याने सोशल मीडियावरील पोलिसांच्या संपर्क क्रमांकाला फोन केला व पुणे पोलिसांनी तातडीने सासवड पोलिसांशी संपर्क करत संशयिताला ताब्यात घेतले.