चार वर्षांच्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू
By admin | Published: April 1, 2017 12:13 AM2017-04-01T00:13:28+5:302017-04-01T00:13:28+5:30
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील संत तुकाराममहाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनी चैतन्या नितीन मासाळ
बारामती/डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील संत तुकाराममहाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनी चैतन्या नितीन मासाळ (वय ४, रा. झारगडवाडी) हिचा शाळेच्या आवारात शाळेतील स्कूल व्हॅनखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ३१) सकाळी ९ वाजता घडली.
या संदर्भात बारामती शहर पोलिसांनी मोहन दगडू नाळे या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी मुलांना सोडण्यासाठी आलेली स्कूल व्हॅनची चैतन्या मासाळला धडक बसली. ती जखमी होऊन पडली. शाळेच्या शिक्षिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने आसपास उभ्या असलेल्या ग्रामस्थांना बोलावले. चैतन्या गंभीर जखमी झाली होती. तातडीने तिला बारामतीच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गाडी रिव्हर्स घेतानाच अपघात झाला, असे सांगण्यात येत होते. मुलीच्या नातेवाइकांनी स्कूल व्हॅनने समोरून धडक दिल्याने अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल व्हॅनला (क्र. एमएच ४२/डी १८७७) कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. गाडीचालक नाळे हेच त्या गाडीचे मालक आहेत. टाटा मॅझिक ही छोटी गाडी असल्याने त्यामध्ये अटेंडंड म्हणून महिला कर्मचारी नसते. गाडीतून सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान मुले उतरल्यानंतर चालक नाळे याने गाडी मागे घेतली. त्या वेळी छोटी चैतन्या ही गाडीच्या पाठीमागील चाकाखाली चिरडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, पालकांनी समोरून ठोकरल्याने अपघात झाल्याची फिर्याद दिली आहे. चैतन्याच्या या अपघाती मृत्यूमुळे झारगडवाडी गावातील मासाळवस्तीवर शोककळा पसरली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या घटनेनंतर मासाळ कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली. तिच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे संस्थेचे प्रमुख प्रा. महादेव काळे यांनी सांगितले. (वार्ताहर)