चार वर्षांपासून कऱ्हेचे बंधारे कोरडे : पावसाने फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 02:32 PM2019-08-21T14:32:13+5:302019-08-21T14:32:13+5:30
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही.
काऱ्हाटी : कऱ्हा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे चार वर्षांपासून कोरडे ठणठणीत आहेत. नाझरे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरंदर उपसाचे पाणी सोडून बंधारे तातडीने भरण्याची मागणी नदीकाठच्या गावातून केली आहे.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागासाठी शासनाने आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी हायस्कूल, जगतापवस्ती, जळगाव कडेपठार, लोणकरवस्ती, कदम वस्ती,कऱ्हा वागज, बऱ्हाणपूर, अशा अनेक भागांत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून या भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीला त्याचा फायदा झाला. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भागवण्यास मदत झाली. मात्र, सलग चार वर्षांपासून या भागात अत्यल्प पडणारा पाऊस व या बंधाऱ्यात पावसाव्यतिरिक्त कुठलेही पाणी येत नसल्यामुळे हे बंधारे कायमच कोरडे ठणठणीत आहेत.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही. मात्र, या भागाच्या दक्षिण व उत्तर दिशेला वाहणारी नीरा व भीमा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या भागातून जाणारी कऱ्हा नदी मात्र कोरडी ठणठणीत आहे. अशाच वेळी पुरंदर उपसा व जानाई शिरसाई उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून बंधारे भरण्याची गरज आहे. मात्र या भागाचं वास्तव्य शासन दरबारी कोणी मांडत आहेत, की नाही, या भागाचे लोकप्रतिनिधी नक्की काय करत आहेत, असा परखड सवाल काºहाटी येथील शेतकरी शिवाजी वाबळे यांनी बोलताना व्यक्त केले.
सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा वेळी पुरंदर उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरावेत अन्यथा रिमझिम पावसाच्या जोरावर केलेल्या शेतातील पिकांचे पाण्यावाचून मोठे नुकसान होणार आहे. पिके वाचविण्यासाठी नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींकडून पाटबंधारे खात्याला तोंडी मागणी केली मात्र त्याचा उपयोग होत नसल्याने आता लेखी पत्र देऊन मागणी करणार आहे.- बी. के. जाधव, सरपंच