पुणे विभागात चौदाशे जणांना हवी किडनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:04+5:302021-02-06T04:19:04+5:30
पुणे : कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यामुळे नवीन वर्षात अवयवदान प्रक्रिया पूर्ववत होऊ लागली आहे. जानेवारी २०२१ मध्ये पुणे विभागात ...
पुणे : कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यामुळे नवीन वर्षात अवयवदान प्रक्रिया पूर्ववत होऊ लागली आहे. जानेवारी २०२१ मध्ये पुणे विभागात मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाच्या ६ शस्त्रक्रिया पार पडल्या. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अवयवदानाची प्रक्रिया संथ झाली होती. जानेवारी ते डिसेंबर २०२० या दरम्यान ३६ मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण झाले. सध्या १४०० रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोना काळात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. केवळ प्रत्यारोपणच नव्हे तर कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रियांवर परिणाम झाला होता. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना उपचारांभोवती एकवटली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागल्यावर प्रत्यारोपण पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले म्हणाल्या, ‘सध्या १४०० रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ३६ मूत्रपिंडे, ६ मूत्रपिंड आणि एक स्वादूपिंड, तसेच एक मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण झाले.’ ससून रुग्णालयात २०२० मध्ये २ मूत्रपिंड आणि १ यकृत प्रत्यारोपण झाले. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रत्यारोपण झाल्यानंतर कोरोना काळात एकही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली नाही.
-------------------------
कसे होते अवयवदान?
* प्रत्यारोपणासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. सामाजिक कार्यकर्ता, समन्वयक, डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्ग अशी टीम प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असते.
* प्रत्येक रुग्णालयामध्ये अवयवदानाचा अर्ज उपलब्ध असतो. अवयवदानासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
* मूत्रपिंड दान जिवंत व्यक्तीच्या स्वसंमतीने अथवा ब्रेनडेड व्यक्तीमार्फत अशा दोन प्रकारे केले जाते.
* एखादा रुग्ण ब्रेनडेड असल्याचे जाहीर झाल्यावर त्याच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महतò समजावून सांगितले जाते. त्यांचे समुपदेशन केले जाते.
* जिवंत व्यक्ती मूत्रपिंड दान करत असल्यास त्याच्यावर अथवा नातेवाईकांवर कोणताही दबाव नसल्याचा जबाब नोंदवला जातो. त्याचे चित्रीकरणही केले जाते.
* विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला प्रत्यारोपणाबाबत माहिती दिली जाते. समितीकडून प्रतीक्षा यादीनुसार प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो.