ऑनलाईन सभेचा चौदा मिनिटांचा तमाशा, साडेचार लाखांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:45+5:302021-02-09T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून ऑनलाईनचा नवीन ‘सेटअप’ उभारून सोमवारी (दि. ८) खास सभा सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून ऑनलाईनचा नवीन ‘सेटअप’ उभारून सोमवारी (दि. ८) खास सभा सुरू करण्यात आली. पण राज्य शासनाच्या प्रत्यक्ष सभा घेण्याच्या आदेशाच्या पत्राचा दाखला देत विरोधकांनी ऑनलाईन सभा अमान्य केली. विरोधकांनी थेट महापौरांच्या दालनात घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला़ सत्ताधाऱ्यांनी या सर्व गोंधळात ऑनलाईन सभा चालवत एक विषय मंजूर करून घेतला. नंतर १८ फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब केली़
केवळ चौदा मिनिटे चाललेल्या या ऑनलाईन सभेच्या ‘तमाशा’ची चर्चा महापालिकेत दिवसभर रंगली. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठीच सत्ताधारी पक्ष प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेण्याचे टाळत आहे, या आरोपावर सत्ताधारी भाजपाने पलटवार केला. विरोधकांनी केलेले आजचे कृत्य हे त्यांची विश्वासार्हता कमी करणारे असल्याचे सांगून, त्यांना अधिकृत कामकाज नको असल्याचा आरोप भाजपाने केला.
कोरोना संसर्गामुळे गेले दहा महिने पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली नाही़ गेल्या चार-पाच महिन्यापासून सभासदांना ‘गुगल’ ची लिंक देऊन ऑनलाईन सभा होत होती़ अनेक नगरसेवक हे महापालिकेतील सभागृहातच उपस्थित राहत. हेच निमित्त साधून सत्ताधारी पक्षाने यापूर्वीच्या सर्व ऑनलाईन सभा तहकूब केल्या होत्या़ त्यामुळे सोमवारची सभा ही स्वतंत्र ऑनलाईन सेट-अप उभारून घेण्याचे ठरले़ याकरिता १५ क्षेत्रीय कार्यालयात मोठे टीव्ही बसवून, त्या भागातील नगरसेवकांना तेथेच सभेस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
चौकट
टीव्ही, एलएडीची व्यवस्था पाण्यात
महापालिकेच्या मुख्य इमारतीत विरोधी पक्षनेते, गटनेते, पत्रकार कक्ष अशा ५ ठिकाणी टीव्ही बसविण्यात आले़ महापौरांच्या सभागृहात २, स्थायी समिती सभागृहात अधिकाऱ्यांसाठी १ व सभागृह नेत्यांच्या दालनात १ अशा चार एलएडी वॉल लावण्यात आल्या़ दिवसाला प्रत्येक टीव्हीकरिता पाच हजार रुपये व एका ‘एलएडी’ वॉलसाठी दहा हजार रुपये असे तीन दिवसांचे कंत्राट या सेटअप उभारणीसाठी देण्यात आले होते़ पण आजच्या या तू-तू मै-मै मध्ये सर्व सेटअपचा गाशा लागलीच गुंडाळला गेला आणि महापालिकेचे सुमारे साडेचार लाख रुपये पाण्यात गेले़
---------------------------------------------
फोटो तन्मयने काढले आहेत़