विजेचा शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:15 PM2022-09-02T18:15:02+5:302022-09-02T18:15:10+5:30
मुलाचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात
धायरी : पाण्याची मोटार चालू करायला गेलेल्या चौदा वर्षीय मुलाला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रणव रोहिदास निवंगुणे (वय: १४ वर्षे, रा. निवृत्ती नगर, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील चरवड वस्ती येथे येथे प्रणव आपल्या कुटुंबासोबत राहतो. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रणव घरातील पाण्याची मोटर चालू करण्याकरिता गेला होता. विद्युत मोटार चालू केल्यानंतर मोटारीचा विद्युतप्रवाह लोखंडी जिन्यात उतरला. दरम्यान प्रणवचा जिन्याला धक्का लागल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला. या विजेच्या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव हा काशिनाथ खुटवड मेमोरियल स्कूल आंबेगाव बुद्रुक येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.