चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील १० हजार नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:43+5:302021-04-02T04:12:43+5:30
पुण्यातल्या सर्व केंद्रावर गुरुवारी लसीकरण करण्यात आले. मात्र नोंदणी करुन आलेले नागरिक आणि थेट आलेले ४५ वर्षांवरील नागरिक या ...
पुण्यातल्या सर्व केंद्रावर गुरुवारी लसीकरण करण्यात आले. मात्र नोंदणी करुन आलेले नागरिक आणि थेट आलेले ४५ वर्षांवरील नागरिक या गोंधळात काही काळ नागरिकांवर वाट पाहण्याची वेळ आली. सर्व केंद्रावर लसीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्य्क आरोग्य अधिकारी डॅा. वैशाली जाधव यांनी दिली.
केंद्राकडून पुणे जिल्ह्यासाठी तब्बल ३ लाख २५ हजार ७८० कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच आगामी २ ते ३ दिवसांत आणखी १ लाख लसीचे डोस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सद्यस्थितीला दररोज बारा ते तेरा हजार जणांचे लसीकरण होत आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीणला प्रत्येकी १ लाख ४० हजार तर पिंपरीला ४५ हजार ७८० डोस मिळाले. त्यामुळे गुरुवारी लसीकरणात कोणतीही अडचण जाणवली नाही.
नव्याने आणखी २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेकडून केंद्राला पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहरातील लसीकरण केंद्राची संख्या तब्बल ३४० इतकी होईल. त्या माध्यमातून दिवसाला जवळपास ७० हजार नागरिकांना लसीकरण करता येऊ शकेल एवढी सोय उपलब्ध होणार आहे.
----
काही लसीकरण केंद्रांवर सकाळच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचा पर्याय संकेतस्थळावर उपलब्ध होत नव्हता. लसीकरणात अडचण येऊ नये, यासाठी ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांचेच लसीकरण सुरुवातीला करण्यात आले. दुपारच्या टप्प्यात सरसकट सर्वांचे लसीकरण करण्यात आले.