कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशीचे चौथ्या टप्प्यातील कामकाज सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:54 AM2019-03-12T01:54:38+5:302019-03-12T01:54:54+5:30
कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे पुण्यातील चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून (११ मार्च) सुरू झाले.
पुणे : कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे पुण्यातील चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून (११ मार्च) सुरू झाले. मात्र, साक्ष तपासणारे, उलट तपासणी घेणारे वकील अनुपस्थित राहिल्याने आयोगाचे फारसे कामकाज होऊ शकले नाही. या टप्प्यातील कामकाज १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि पुण्यात आयोगाचे सुनावणी घेण्याचे कामकाज सुरू आहे. आयोगाकडून पुण्यात पहिल्या टप्प्यात तीन ते सहा आॅक्टोबरपर्यंत चार जणांच्या साक्षी तपासण्याचे कामकाज करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्याचे १२ ते १६ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे कामकाज २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान झाले. आता, चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून जुन्या जिल्हा परिषदेत सुरू झाले.
सोमवारी शरद दाभाडे यांची साक्ष नोंदवण्याचे आणि उलट तपासणीचे काम होणार होते. परंतु, काही अपरिहार्य कारणास्तव वकील अनुपस्थित राहिल्याने कामकाज होऊ शकले नाही. तर, कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच आणि कोरेगाव भीमा हिंसाचारातील प्रमुख साक्षीदार गणेश फडतरे यांना मंगळवारी (१२ मार्च) आयोगासमोर हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले. आयोगाचे कामकाज पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारकडून आयोगाला ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.