बाह्यवळण की चौपदरीकरण?
By admin | Published: December 29, 2014 11:20 PM2014-12-29T23:20:04+5:302014-12-29T23:20:04+5:30
पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत.
निनाद देशमुख ल्ल पुणे
पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत. यामुळे मूळ रस्त्याचे चौपदरीकरण होणार, की बाह्यवळण या संभ्रमात येथील शेतकरी आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर चौक, खेड घाट, पेठ घाट, अवसरी घाट, मंचर, कळंब, नारायणगाव बसस्थानक, तसेच आळेफाट्याजवळील कुकडी नदीवरच्या अरुंद पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी व जलद वाहतुकीसाठी खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांत बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकीकडे जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर शिक्के मारले जात आहे. त्याचबरोबर आहे त्या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहे. यामुळे बाह्यवळण होणार की चौपदरीकरण याबाबतची संभ्रमावस्था वाढली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि खेड या परिसरात बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी जमिनींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
आतापर्यंत मोजणीसाठी आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. एकीकडे गुंठ्याला ५ लाख रुपये भाव असताना ज्यांच्या जमिनी या बाह्यवळणात जात आहे, त्यांना केवळ गुंठ्याला ६० हजार रुपये भाव देण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी या
प्रक्रियेमुळे भूमिहीन होणार
असल्याने त्यांचाही या रस्त्याला
विरोध आहे. बाह्यवळण न करता
आहे त्या मार्गाचेच रुंदीकरण
करण्यात यावे, अशी त्यांची
भूमिका आहे.
कळंब, एकलहरे परिसरातील मोठ्या प्रमाणात झाले रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जात आहे. या झाडांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. शेतकऱ्यांचा बाह्यवळणाला विरोध आहे. शासनाने आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करावे. असे झाल्यास काही प्रमाणात जमिनी जातील, तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्नही सुटेल.
प्रभाकर बांगर
अध्यक्ष, शेतकरी बचाव कृती समिती
जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. आता परत या रस्त्यासाठी जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहे. भविष्यातही रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहीत होतील. यामुळे शेतकऱ्यांची जमिनी देण्याची मानसिकता नाही.
- महेश शिंदे
शेतकरी, नारायणगाव
४केंद्र शासनाने या रस्त्याचे काम पुणे-नाशिक महामार्ग विभाग क्र. ६२ कडून काढून घेतले आहे. ते केंद्रीय
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या विभागाने चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेली सर्व मोठी झाडे तोडण्यात आली आहे.
४मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी ज्या ज्या ठिकाणी बाह्यवळण आहे, त्या त्या ठिकाणी जागांचा ताबा अद्याप घेतलेला नाही़ पुणे-नाशिक महामार्गावरील खेड, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा या पाच गावांमध्ये बाह्यवळण प्रस्तावित आहे. नगर जिल्ह्यातील बोटा आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावांमध्ये बाह्यवळण (बायपास) करण्यात येणार आहे़
खेड ते सिन्नर असे १३५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे़ हे काम २०१६पर्यंत होणे अपेक्षित आहे. या चौपदरीकरणाच्या दरम्यान चाळकवाडी व संगमनेरजवळ असे दोन टोलनाके उभारण्यात येणार आहे़
दोन वर्षांपूर्वी माजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम चौपदरी एवजी
सहा पदरी करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे हा प्रस्ताव तसाच राहिला.
बाह्यवळणासाठी अजून जमिनींचे भूसंपादन झालेले नाही. जोपर्यंत आम्हाला जमिनी मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला कामे करता येणार नाही. नारायणगाव ते आळाफाटादरम्यानचा रस्ता मोठा करण्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ती तोडली जात आहे. जवळपास १२ ते १३ किलोमीटर परिसरातील रस्ता रुंदीकरणामध्ये येणारी झाडे तोडावी लागणार आहे.
- डी. एस. झोडगे,
पुणे-नाशिक राष्ट्रीय
महामार्ग प्रकल्प संचालक