Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण जोरात जनता संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:13 AM2022-09-27T09:13:27+5:302022-09-27T09:15:28+5:30
प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे...
पिंपरी : तळेगावमध्ये नियोजित असलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे गुजरातला स्थलांतर झाले. त्यामुळे राज्यातील तब्बल दीड लाख तरुणांचा रोजगार बुडाला आहे. यावरून आता सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत. प्रकल्प नेमका कोणामुळे राज्याबाहेर गेला हे सांगण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मैदानात उतरले आहेत. प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
तळेगावमध्ये सेमीकंडक्टर बनवण्याचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यानंतर याला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे सांगत विरोधक असलेल्या महाविकास आघाडीने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यावरून ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच शनिवारी (दि. २४) आदित्य ठाकरे यांनी वडगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील जनतेला गाजर नको तर रोजगार हवा आहे. त्यामुळे या खोके सरकारविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश मोर्चा आणखी तीव्र करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.
शनिवारी झालेल्या या जनआक्रोश मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपदेखील मैदानात उतरली आहे. भाजपच्या वतीने सोमवारी (दि. २६) वडगाव नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन झाले. यामध्ये खासदार श्रीरंग बारणे, आमदार राम कदम यांनी सहभागी होत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे राज्यातील जनतेशी खोटे बोलत असून प्रकल्प त्यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच बाहेर गेला असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच प्रकल्प राज्यात येण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असताना ‘मविआ’मधील नेते त्यांच्याकडे पैसे मागत असल्याचा आरोपही केला. आगामी काळात प्रकल्प नेमका कोणामुळे बाहेर गेला हे सांगण्यासाठी राज्यातील गावा-गावामध्ये जाणार असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले. त्यामुळे राज्यामध्ये भविष्यात एका बाजूला आदित्य ठाकरे यांचे जनआक्रोश आंदोलन असणार आहे. तर दुसरीकडे भाजपाचे ठिय्या आंदोलन असणार आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कोणामुळे गेला हे सांगण्यासाठी सत्ताधारी विरोधक दोघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे. मात्र, सत्ताधारी विरोधकांच्या या आंदोलनामुळे जनता संभ्रमात सापडली आहे.
भाजपाचे दावे
आदित्य ठाकरे यांनी मावळात येत जनतेची दिशाभूल केली. तळेगाव निगडे टप्पा क्रमांक ४ मध्ये एमआयडीसीसाठी ६ हजार ६०० एकर जमीन होती. त्यामधील गावासाठी व शेतीसाठी जमीन सोडून ५ हजार ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार होते. २०१८ सालामध्ये शासनाच्या वतीने ७३ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या संमतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. मात्र, ही प्रक्रिया लांबवण्यात आली. तसेच भूसंपादन करण्यात येणाऱ्या काही भागामध्ये इको सेन्सिटिव्ह भाग होता. त्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी परवानगीसाठी तो केंद्र सरकारकडे पाठवणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने कंपनीने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा भाजप करत आहे.
महाविकास आघाडीचे दावे
महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये जात असल्याने कुंचबणा होत आहे. वेदांता व बल्क ड्रग पार्कसारखे महत्त्वाचे दोन प्रकल्प सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे राज्याबाहेर जात आहेत. वेदांता प्रकल्प तळेगावमध्ये येणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सभागृहामध्ये जाहीर केले होते. त्यानंतर एक महिन्यामध्ये असे काय झाले की दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा वेदांता प्रकल्प बाहेर गेला, असा सवाल महाविकास आघाडी करत आहे.