विहिरीमधे पडलेल्या कोल्ह्यांना वन विभागाकडून जीवदान; रेस्क्यू टीम, ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:43 AM2024-04-08T11:43:50+5:302024-04-08T11:45:06+5:30
या जोडीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला....
कवठे येमाई (पुणे) : शिरूर तालुक्यातील बेट भागातील निमगाव दुडे येथे शनिवार रात्री विहिरीत पडलेल्या कोल्ह्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचारी, रेस्क्यू टीम व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. या जोडीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
निमगाव दुडे येथील बाळासाहेब दाते यांची सिमेंटच्या रिंगमध्ये बांधकाम केलेली विहिर असून या विहिरीत पाणी आहे. पाण्याच्या शोधात असलेली कोल्ह्याची जोडी शनिवारी रात्री विहिरीत पडली. ही घटना सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. सकाळी शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी आलेल्यांनाही कोल्ह्यांची जोडी विहिरीत दिसून आली.
ही बाब त्यांनी वनविभागाला कळविली. वनपरीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या सूचनेनुसार वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड व वनमजूर हनुमंत कारकुड यांनी परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना विहिरीच्या कपारीच्या आधाराला पाण्यात असलेली
ही जोडी दिसून आली. वन मजूर हनुमंत कारकुड यांनी अरुण रावडे, विजय दंडवते, बाळासाहेब दाते, हसन मुजावर, वैभव पानगे, यांच्या मदतीने विहिरीत उतरून अत्यंत शिताफीने या जोडीला जीवरक्षक स्टिकच्या साह्याने पकडले.
यावेळी या टीमने या जोडीला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या जीवदान दिले. ही कोल्ह्याची जोडी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे पाहून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले, असे वनपाल गणेश पवार यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल वनमजूर हनुमंत कारकुड यांच्या धाडसी कामगिरीबद्दल परिसरातून
विशेष कौतुक होत आहे.