Pune | यंदा फुल बाजारात उत्पन्नवाढीचा 'सुगंध' वाढला
By अजित घस्ते | Published: April 6, 2023 06:01 PM2023-04-06T18:01:21+5:302023-04-06T18:01:34+5:30
यंदा बाजार समितीला ७२ लाख ५२ हजार लाखांचा महसूल फूल बाजारातून मिळाला
पुणे : मार्केटयार्डातील फुल बाजार यंदा चांगलाच फुलला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ७२ लाख ५२ हजार १८७ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. तर निव्वळ बाजार शुल्कामध्ये (सेस) ३० लाख २५ हजार ४९३ रुपयांनी वाढ झाली आहे. करोना-लॉकडाऊननंतर पूर्ण क्षमतेने यावर्षी बाजार सुरू झाल्याने ही वाढ झाली असल्याचे कृषि उन्पन्न बाजार समितीचे सचिव दिगंबर हौसारे यांनी सांगितले.
करोना काळात तर कित्येक महिने फुल बाजार बंद होता. मंदिरे बंद असल्याने फुलांची विक्री होत नव्हती. मागणी कमी पर्यायाने भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून फुलांची कमी लागवड करण्यात आली होती.
त्यामुळे २०२१-२२ मध्ये १ कोटी ५१ लाख २४ हजार ३११ रूपये उत्पन्न झालो होते. तर २०२२-२३ मध्ये १ कोटी ८१ लाख ४९ हजार ०५८ रूपये महसूल वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ७२ लाख ५२ हजार १८७ रुपयांनी उत्पन्न वाढले असून यामध्ये ३२ लाख सेस तर भाडे, जादा दर दंड असे ७० लाख वसूल करण्यात आले आहे. एकूणच फुल बाजारात यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे.
करोनामुळे फुल बाजारातील आवक पर्यायाने उलाढाल कमी झाली होती. मात्र, आता आवक जास्त होत आहे. सण-उत्सव उत्साहाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे फुल बाजारातील वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी कष्ट घेऊन चांगले काम केले आहे. दिवाळीसह अन्य सणांना गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट आवक झाली असल्याने यंदा २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ७२ लाख ५२ हजार १८७ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.
- बाळासाहेब कोंडे, फुलविभाग प्रमुख, बाजार समिती