फ्रान्सचे प्रिमियम झिंगी सफरचंद भारतात पहिल्यांदाच दाखल
By अजित घस्ते | Published: October 22, 2023 06:12 PM2023-10-22T18:12:18+5:302023-10-22T18:12:41+5:30
रंगाने लाल, चमकदार, चवीने आंबट-गोड क्रिप्सी असलेल्या या सफरचंद पुढील सहा महिने बाजारात उपलब्ध होणार
पुणे : फ्रान्सच्या अंजोऊ प्रदेशातून झिंगी वाणाचे सेंद्रीय सफरचंद भारतात प्रथमच मार्केटयार्डात रविवारी दाखल झाले. रंगाने लाल, चमकदार, चवीने आंबट-गोड क्रिप्सी असलेल्या या सफरचंद पुढील सहा महिने बाजारात उपलब्ध होणार आहे. किरकोळ बाजारात एक किलो सफरचंदाची विक्री ३०० रूपयांनी केली जात आहे.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारातील रोहन उरसळ यांच्या गाळ्यावर विमानाने फ्रान्स येथून ५०० किलो सफरचंदाची आवक रविवारी झाली. झिंगी सफरचंद हे एका पनेटमध्ये ६ सफरचंदांचे पॅक असून सुमारे अडीच किलोचा एक ट्रे अशा पॅकींगमध्ये ही सफरचंद विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. सध्या बाजारात पाचशे किलो सफरचंद विक्रीस आणले असून लवकरच २१ टन सफरचंदाची आवक होणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पुढील सहा ते सात महिने हे सफरचंद बाजारपेठांत विक्रीस उपलब्ध असेल, अशी माहिती मार्केटयार्डातील फळांचे आडतदार रोहन उरसळ यांनी दिली.
उरसळ म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून भारतात पेरदेशी फळांची मागणी वाढत चालली आहे. सफरचंदाची झिंगी हे वाण इनाटिसने या फ्रान्स कंपनीने लॉन्च केले आहे. नावाप्रमाणेच झिंगी सफरचंदांला गोड आणि चटकदार चव आहे. हे सफरचंद अतिशय क्रंची आणि ज्यूसी असून ते आकर्षित लाल रंग, गोल आकाराचे असतात. जागतिक फळबागांमधून आपल्या देशाच्या कानाकोपर्यात या उच्च दर्जाच्या फळांचे वितरण करण्यासाठी डॉन लिमन आणि सायन अॅग्रिकोस या कंपन्यांनी डी.बी. उरसळ आणि ग्रँड सन्स सोबत भागीदारी केली आहे.