संमेलनाध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 02:13 AM2018-12-13T02:13:03+5:302018-12-13T02:13:16+5:30
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित यंदाच्या १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे.
पुणे : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित यंदाच्या १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. दि. २३ आणि २४ डिसेंबर रोजी साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याचे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे आणि प्रतिष्ठानचे सचिव व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी कळविले आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनात चित्रप्रदर्शन, कथाकथन, विविध विषयांवरील परिसंवाद , तसेच साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती होणार आहेत.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची २० पुस्तके प्रकाशित झाली असून अभ्यासू लेखक आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून ते सुपरिचीत आहेत. यापूर्वी अध्यक्षपद डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सदानंद मोरे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. आनंद यादव, राजन खान, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. यशवंत मनोहर, रामदास फुटाणे, फ. मु. शिंदे, उत्तम कांबळे आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी भूषविले आहे.