हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून '२ लाखांची' फसवणूक; किरण गोसावीवर भोसरीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:25 PM2021-11-12T15:25:47+5:302021-11-12T15:26:01+5:30
फिर्यादीने नोकरी मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन ॲप्लीकेशन केले होते
पिंपरी : परदेशात ब्रुनेई येथे हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून सव्वादोन लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी किरण प्रकाश गोसावी (वय ३६, रा. ठाणे) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय ३३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी याप्रकरणी गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २०१५ मध्ये नोकरी शोधत होते. नोकरी मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन ॲप्लीकेशन केले होते. तसेच विविध जॉब पोर्टल वरून त्यांना नोकरीसाठी ऑफर येत होत्या. २१ मार्च २०१५ ला विजयकुमार कानडे यांना मेल आला. परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी असल्याचे नमूद केले होते. त्यासाठी कानडे यांचा बायोडेटा मागवण्यात आला. कानडे यांनी त्यांचा बायोडेटा मेलद्वारे पाठविला.
गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे सांगितले. कानडे यांचा विश्वास संपादन करून नाशिक फाटा कासारवाडी येथे भेटून ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर कानडे यांनी ५ एप्रिल २०१५ ला शिवा इंटरनॅशनल, माजीवाडा, ठाणे येथील कार्यालयात जाऊन किरण गोसावीला ४० हजार रुपये दिले.
किरण गोसावीच्या सांगण्यावरून एका बँक खात्यावर कानडे यांनी २० हजार रुपये पाठवले. वैद्यकीय तपासणीसाठी किरण गोसावी याच्या ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन कानडे यांनी १० हजार रुपये भरले. वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात दोन लाख २५ हजार रुपये कानडे यांनी आरोपी किरण गोसावी याला दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.