बोगस तिकिटे विक्रीप्रकरणी तरुणाला अटक, सनबर्न फेस्टिव्हलबाबत केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:31 AM2018-03-14T01:31:42+5:302018-03-14T01:31:42+5:30
सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकिटे विकणा-या तरुणाला सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे़
पुणे : सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकिटे विकणा-या तरुणाला सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे़ मोहम्मद हुजेफा हनीफ घराडे (वय १८, रा़ सारा अपार्टमेंट, नालासोपारा, पालघर) असे त्याचे नाव आहे़ त्याच्याकडून २ मोबाईल, ४ सिमकार्ड, १ डेबिट कार्ड, २ पेनड्राईव्ह, १ लॅपटॉप, १ सनबर्नचे कार्ड असा माल जप्त केला आहे़
उंड्री येथील एकाने फेसबुकवर असलेल्या सनबर्नचे पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून ५ तिकिटे खरेदी केली होती़ त्यासाठी त्यांनी १८ हजार रुपये पेटीएमद्वारे ट्रान्सफरही केले़ प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेल्यावर त्यांना ही तिकिटे बोगस असल्याचे सांगण्यात आले़ त्यावरून त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती़ या गुन्ह्याचा सायबर सेलमार्फत समांतर तपास सुरू असताना दिलेल्या मोबाईलवरून तो नालासोपारा पश्चिम येथे असल्याची माहिती मिळाली़
पोलिसांनी तेथे जाऊन मोहम्मद घराडे याला पकडले़ पुढील कार्यवाहीसाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे़
ही कामगिरी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, उपनिरीक्षक मंदा नेवसे, पोलीस हवालदार अत्तार, अब्दागिरे, गावडे, बिचेवार, दिवाणे या पथकाने केली़ बोगस तिकिटे देऊन कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा.
आॅनलाईन फसवणुकीच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये अनेक जणांची फसवणूक होत आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.