बँकेतच झाली फसवणूक
By admin | Published: March 26, 2017 01:55 AM2017-03-26T01:55:21+5:302017-03-26T01:55:21+5:30
कंपनीचे मालक माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून बँकेत पैसे भरण्यास आलेल्या एकाची सव्वालाखाची रक्कम लंपास
पिंपरी : कंपनीचे मालक माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून बँकेत पैसे भरण्यास आलेल्या एकाची सव्वालाखाची रक्कम लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास बँक आॅफ बडोदाच्या भोसरी शाखेत घडली. किरण गाडेकर (वय २७, रा. चऱ्होली, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. दिवसभराचे कंपनीतील पैसे भरण्यासाठी तो शुक्रवारी दुपारी भोसरी येथील बँक आॅफ बडोदामध्ये आला होता. त्या वेळी बँकेत आलेल्या एका अनोळखी इसमाने किरण यांना बोलण्यात गुंतविले. विश्वास संपादन करून कॅशिअरकडे पैसे भरतो. असे सांगून किरण यांच्याकडील एक लाख ४८ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन कॅश काउंटरला दिली. त्यानंतर बँकेच्या बाजूलाच माझे कार्यालय आहे. तेथून ५ लाख रुपये आणण्यास किरण यांना पाठविले. कॅश काउंटरला दिलेल्या एक लाख ४८,५०० रुपयांपैकी एक लाख २४ हजार ५०० रुपये आरोपीने काढून घेतले. त्यानंतर पसार झाला.(प्रतिनिधी)