कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:29 IST2025-01-10T20:21:58+5:302025-01-10T20:29:01+5:30
कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर

कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
पिंपरी : कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी काही सायबर चोरटे सक्रिय झाले असून, त्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.
कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. बनावट वेबसाइट, लिंक किंवा इतर माध्यमांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करतात.
ही बाब भारत सरकार गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे. बनावट वेबसाइटद्वारे कुंभमेळ्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइटचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच ऑनलाइन बुकिंगद्वारे फसवणूक करण्याकरिता भाविकांसाठी निवास व्यवस्था, दर्शन पास इत्यादी बुकिंगच्या नावाखाली बनावट वेबसाइटद्वारे पैसे उकळले जात आहेत.
ही घ्या खबरदारी- बनावट लिंक टाळा :
कुंभमेळासंबंधी बनावट लिंक, बेवसाइट्स किंवा मेसेजवर क्लिक करू नका.
- सत्यता तपासा : कुंभमेळासंबंधी अधिक माहितीसाठी https://kumbh.gov.in अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.
- आपली गोपनीय माहिती शेअर करू नका : बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका.
- फसवणुकीचा संशय आल्यास सायबर हेल्पलाइन cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.