पूजा खेडकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 05:47 AM2024-07-20T05:47:22+5:302024-07-20T05:47:43+5:30
स्वत:ची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे ‘यूपीएससी’ने एका निवेदनात म्हटले आहे.
नवी दिल्ली : बनावट ओळख देऊन नागरी सेवेत रुजू होण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांच्या विरोधात शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा यांच्यावर आहे. पूजा यांनी त्यांचे, आई-वडिलांचे नाव, स्वत:चे छायाचित्र, स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, पत्ता हे सारे बदलले. स्वत:ची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे ‘यूपीएससी’ने एका निवेदनात म्हटले आहे.
यूपीएससीने कोणती पावले उचलली?
पूजा खेडकर यांच्या विरोधात ‘यूपीएससी’ने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा खटला चालविला जाईल, तसेच नागरी सेवेतील त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी सेवा-२०२२च्या नियमांनुसार भविष्यात पूजा यांच्यावर परीक्षा देण्यासाठी व निवड होण्याबाबत बंदी घालण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली. तसेच पोलिसांनीही नागरी सेवेमध्ये संधी मिळण्यासाठी दिव्यांगांच्या कोट्याचा गैरवापर करणे, फसवणूक, गैरवर्तन या आरोपांखाली गुन्हा नोंदविला आहे.
कायदा आपले काम करेलच. आरोपांबाबत मला जे काही सांगायचे ते मी न्यायालयात सांगेन.
- पूजा खेडकर