सीएनजी पंपांवर फसवणुकीच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:29 AM2018-11-25T02:29:31+5:302018-11-25T02:29:54+5:30
पुणे : शहरातील काही सीएनजी पंपांवर गॅस भरताना वाहनचालकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आम आदमी रिक्षा चालक संघटनेने ...
पुणे : शहरातील काही सीएनजी पंपांवर गॅस भरताना वाहनचालकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आम आदमी रिक्षा चालक संघटनेने केला आहे. गॅसच्या वजनाची चाचणी घेण्याचे यंत्रही सध्या वैधमापन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सीएनजीवरील रिक्षा, चारचाकी वाहने तसेच पीएमपीची आर्थिक लूट झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
शहरातील ९५ टक्के रिक्षा सीएनजीवर धावतात. तसेच पीएमपीच्या शेकडो बस, अनेक खासगी वाहनांसाठी सीएनजीचा वापर केला जातो. मात्र, सीएनजी पंपांवर अनेक वेळा क्षमतेपेक्षा अधिक इंधन भरले असे भासवून जास्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. कायद्याप्रमाणे सीएनजी पंपावर अवैध किंवा स्क्रॅप रिक्षांमध्ये इंधन भरणे बेकायदेशीर आहे. त्यानंतरही काही पंपांवर ५० रुपये अधिक आकारून इंधन भरले जाते. स्क्रॅप रिक्षाच्या इंधनाच्या टाक्यांची दाबाची चाचणी केलेली नसते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सीएनजीच्या विक्रीवेळी गॅसचा दाब २२० पीएसआय असावा व घनता हे पूर्वनियोजित असावी, अशी मानांकने आहेत. पण संघटनेने केलेल्या पाहणीत हा दाब १६० ते १८० पीएसआय इतका कमी असल्याचे आढळले. अशा परिस्थितीत अधिक वजन पंपांवर दिसते, पण प्रत्यक्षात कमी वजनाचा गॅस टाकीत उतरतो. पैसे मात्र मीटरप्रमाणेच आकारले जातात. त्यामुळे संघटनेने वैधमापन विभागाकडे चाचणीचा आग्रह धरला आहे, अशी माहिती संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी दिली.