माजी महापौरांसह अनेकांना गंडा घालणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:16 PM2018-10-10T21:16:28+5:302018-10-10T21:17:11+5:30
जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे़.
पुणे : जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यास डेक्कन पोलिसांनीअटक केली आहे़.
आशिष काळुराम गोयरे (वय४१, रा़ शंकर महाराज मठाजवळ, हडपसर) असे त्याचे नाव आहे़. आशिष याच्यावर समर्थ, शिवाजीनगर, अलंकार, डेक्कन अशा अनेक पोलीस ठाण्यात यापूर्वी फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत़. डेक्कन पोलिसांनी त्याला अशाच एका प्रकरणात २००७ मध्ये अटक केली होती़. तो अनेक वर्षे फरार होता़.
याप्रकरणात इंद्रनिल गजमुले यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. यांची हिंजवडी येथे २० गुंठे जमीन आहे़. .या जमिनीची आशिष याने २०१७ मध्ये बनावट विसार पावती बनविली व त्याआधारे ती जागा लता केरकर, समीर केरकर, केतन केरकर यांना विकण्याचा घाट घातला़. त्यासाठी त्यांना वृत्तपत्रात जाहिरात देण्यास लावली होती़. ही जाहिरात फिर्यादी इंद्रनिल यांच्या पाहण्यात आली़ त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली होती़. त्यानंतर पोलीस आशिषचा शोध घेत होते़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आशिष हा बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा विकण्याची असल्याचे दाखवून इसार रक्कम घेऊन फसवणूक करीत असे़ माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांना नवी पेठेतील जागा विकायची असल्याचे सांगून २०१४ मध्ये त्यांना कागदपत्रे दाखविली व त्यांच्याकडून इसार रक्कम घेतली होती़. त्यानंतर त्यांना जागा न विकता त्यांची फसवणूक केली होती़. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़. याच प्रकारे त्याने अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ८५ लाख रुपये, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे़. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत़.