कर्ज घेऊन फसवणारा ताब्यात
By admin | Published: May 7, 2017 03:14 AM2017-05-07T03:14:27+5:302017-05-07T03:14:27+5:30
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून व्यावसायिक वाहनावर कर्ज घेऊन ते न फेडता परस्पर वाहनांची विल्हेवाट लावत फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून व्यावसायिक वाहनावर कर्ज घेऊन ते न फेडता परस्पर वाहनांची विल्हेवाट लावत फसवणूक करणाऱ्या तीन ठगांपैकी एका आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रदीप काळुराम कदम (रा. ५८६, कदमवाडा, कात्रज गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीसह अली अहमद अब्दुल करीम खान ( रा. मार्केट यार्ड ) व श्रीकांत महादेव बडुरे (रा. सवर््हे नं १२३/२/४, कात्रज) यांनी आपापसांत संगनमत करून एकमेकांना जामीनदार होत बडुरे यांच्या नावावर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून जेसीबी मशिन व २ डंपर अशा ३ व्यावसायिक वाहनांवर एकूण २२ लाख रूपयांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन कर्जाचे हप्ते न भरता कंपनीच्या परवानगीशिवाय २ वाहने व मशिनची विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली होती.
परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस ठाणे विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, श्रीधर पाटील, समीर बागसिराज, बाळासाहेब नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
३ आरोपींपैकी कदम हा आरोपी कात्रज गाव भैरवनाथ मंदिरासमोर थांबलेला असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे यांना माहिती मिळाली असता तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासामध्ये ही तीन वाहने वेगवेगळ्या ठिकाणी त्याने ठेवल्याचे निष्पन्न झाले. जेसीबी मशिन जप्त करण्यात आले आहे. तर डंपरबाबत तपास सुरू आहे.