आर्मीमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: April 11, 2024 02:49 PM2024-04-11T14:49:54+5:302024-04-11T14:50:10+5:30
शेख यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटा बनावट बँकेचा डीडी पाठवून तसेच विमानाचे बनावट तिकीट पाठवून हे पैसे उकळण्यात आले...
पुणे : आर्मीमध्ये नोकरीला लावतो असे सांगत, विश्वास संपादन करून १२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तेरुनिसा बाबु शेख (६०, रा. शिवाजीनगर) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, राहुल उर्फ दिगंबर हिरामण मोहिते, मोहित पवनकुमार सेवक आणि राजकुमार सारसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांचा नातु बिलाल याला आर्मीमध्ये नोकरी लावतो असे तिघांनी सांगत विश्वास संपादन केला. तसेच बिलाल याच्यावर असलेली फौजदारी केस निल करतो असे खोटे आश्वासन देऊन शेख यांचे सासरे व पती यांच्या नोकरीची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळवून देतो असे सांगून वेळोवेळी १२ लाख ३१ हजार रुपये उकळले. हा प्रकार २०२० ते २०२१ या दरम्यान घडला.
शेख यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटा बनावट बँकेचा डीडी पाठवून तसेच विमानाचे बनावट तिकीट पाठवून हे पैसे उकळण्यात आले. यानंतर कोणतेच काम होत नसल्याचे लक्षात येताच, तेरूनिसा शेख यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले, त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दांगडे करत आहेत.