पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली सव्वासहा लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: July 10, 2024 06:28 PM2024-07-10T18:28:46+5:302024-07-10T18:29:07+5:30
रिमोट ऍक्सेस मिळवून युवकाच्या खात्यावर ६ लाख ९२ हजारांचे परस्पर लोन घेत फसवणूक केली
पुणे: पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ०९) उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय युवकाने पोलिसांना फिर्याद दिली आहे. अनोळखी आरोपीने फिर्यादींना फोन करून एचडीएफसी बँकेतून मोहन पाठक नावाचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या पॉलिसीबद्दल माहिती देऊन पॉलिसी सेटलमेंट करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. त्यामध्ये मूळ रक्कम १७ लाख ७२ हजार आणि बोनस रक्कम २ लाख ४६ हजार रुपये रक्कम असून तुम्हाला काढायची असल्यास आमच्या वरिष्ठाशी बोलावे लागेल असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून लिंक पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्याद्वारे रिमोट ऍक्सेस मिळवून फिर्यादी यांच्या खात्यावर ६ लाख ९२ हजारांचे परस्पर लोन घेत फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंदारे हे करत आहेत.