उतारवयात जोडीदाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तीची १६ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:43 PM2022-04-18T17:43:35+5:302022-04-18T18:29:39+5:30
ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांचा डल्ला
पुणे : उतारवयात सोबत असावी, म्हणून एका ज्येष्ठ नागरिकाने केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. तरी दुसऱ्या संकेतस्थळावर नावनोंदणी करायला लावत स्थळ दाखविण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी त्यांना तब्बल १६ लाख ३२ हजार रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी वाघोली येथील एका ६३ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वीज मंडळातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे पत्नी व मुलांशी पटत नसल्याने ते वेगळे राहतात. उतारवयात कोणीतरी सोबत असावे, यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी नावनोंदणी केली होती. त्यानंतर त्यांच्याशी लव्ह इन या संकेतस्थळावरून संपर्क साधण्यात आला.
नावनोंदणीसाठी ९२० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरले. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन करून त्यांना स्थळ दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार ५७९ रुपये ऑनलाईन घेतले. मात्र कोणतेही स्थळ दाखविले नाही अथवा पैसे परत न करता फसवणूक केली. लोणीकंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.