लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक
By नितीश गोवंडे | Published: July 3, 2024 05:28 PM2024-07-03T17:28:44+5:302024-07-03T17:29:56+5:30
लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे: भारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील तिघांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तिघांची तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक केली. लष्कराची गुप्तचर यंत्रणा (मिलिटरी इंटेलिजन्स) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोल्हापुरातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सातप्पा रामचंद्र वागरे (४६, रा. करंजफेल शिरोली ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदिप बळवंत गुरव (३९, रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जून २०२० ते १२ जुलै २०२१ या कालावधीत मिलिटरी हॉस्पिटल, खडकी येथे घडला आहे.
लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. आरोपी संदीप गुरव याची साथीदार अश्विनी पाटील हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची देखील चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साताप्पा वागरे हे कोल्हापूर येथील राधानगरी एसी आगारात वाहक (कंटक्टर) म्हणून काम करतात. २०२० मध्ये एका मित्रामार्फत त्यांची संदीप गुरव याच्यासोबत ओळख झाली. गुरव हे आर्मीमधून सेवानिवृत्त झाले असून त्यांची मोठी ओळख असून वेगवगेळ्या पदावर नोकरी लावण्याचे ते काम करतात असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा भाचा हा आर्मी भरतीची तयारी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी संदीप कडे भाच्याला आर्मीत नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
त्यानंतर संदीप याने वाघरे यांना त्यांच्या भाच्याला घेऊन खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. कुटुंबातील तीन जणांनी भेट घेतली. संदीप याने तिघांचे नोकरीचे काम होईल असे सांगितले. मात्र, प्रत्येकी बारा लाख रुपये प्रमाणे ३६ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानुसार फिर्यादी यांच्यासह तिघेजण नोकरीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी आले असता मिलिटरी हॉस्पिटलच्या गेटवर त्यांना नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. संदीप गुरव याने पैसे घेऊन नियुक्तीचे बनावट पत्र देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. आरोपी संदीप याने इतर काही जणांची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.