Pune: रिझर्व्ह बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ४१ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: January 25, 2024 04:41 PM2024-01-25T16:41:32+5:302024-01-25T16:42:04+5:30
याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : मुलीला रिझर्व्ह बँक किंवा इंडिया किंवा सेबीमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकाची ४० लाख ८२ हजार ५५१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव दिग्विजयनाथ पांडे (रा. न्यू फ्रेंड कॉलनी, नवी दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या काळात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव पांडे आणि फिर्यादी यांच्या मुलीची ओळख एका विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झाली होती. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी गौरव पांडे यांचा संपर्क झाला. आरोपीने तो इन्कम टॅक्स विभागात कमिशनर पदावर असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी पांडे याने फिर्यादी यांना आरबीआयमध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये २० ते २५ लाख गुंतवले तर २ कोटी रुपये मिळतील असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांच्याकडून काही रक्कम घेतली. तसेच आरोपी पांडेने फिर्यादी यांना तुमच्या मुलीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा सेबीमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. तसेच आरोपी पांडेने फिर्यादी यांच्या मुलीला खोटे नियुक्तीपत्र दिले. यामुळे तिने चालू असलेला जॉब सोडला. या बदल्यात ४० लाख ८२ हजार ५५१ रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सावंत करत आहेत.
दरम्यान, आरोपी गौरव पांडेची फिर्यादी यांच्या मुलीशी विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झाली होती. आरोपी गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी गौरव पांडेवर बंड गार्डन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.