Pune Crime: लोन ऍपच्या माध्यमातून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 24, 2023 17:32 IST2023-07-24T17:31:06+5:302023-07-24T17:32:00+5:30
पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला...

Pune Crime: लोन ऍपच्या माध्यमातून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीची फसवणूक
पुणे : लोन ॲपच्या माध्यमातून एका २७ वर्षांच्या तरुणीची बदनामीसह फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. ४ जुलै ते २३ जुलै २०२३ दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध चतुःशृंगी पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
तक्रारदार तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी तरुणीने त्यांच्या मोबाईलवर एक लोन ॲप डाऊनलोड करून व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहितीसह स्वतःचा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर त्यांनी लोनसाठी ॲपद्वारे अर्ज केला होता. अर्ज मजूर होऊन तरुणीच्या बँक खात्यात लोनची रक्कम जमा झाली. दिलेल्या मुदतीमध्ये तरुणीने लोन म्हणून घेतलेले पैसे व्याजासहित भरले. त्यानंतर तरुणीला तीन वेगवेगळ्या मोबाईलवरुन पैसे जमा करण्यासाठी धमकी येत होती.
पैसे जमा केले नाहीतर त्याचे अश्लील फोटो कुटुंबीयांसोबत इतरांना पाठवून त्याची बदनामी करण्याची धमकी दिली होती. आपली बदनामी होऊ नये या भीतीपोटी महिलेने ४९ हजार ५०० रुपये भरले. तरीसुद्धा तरुणीला फोन करून आणखी पैशांची मागणी करण्याचा प्रकार सुरूच होता. त्यानंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना ही माहिती सांगून संबंधित तिघा व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर संबंधित आरोपींविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.