हॉस्पिटलची अपॉईंटमेन्ट घेण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: October 27, 2023 04:58 PM2023-10-27T16:58:27+5:302023-10-27T16:59:27+5:30
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे: हॉस्पिटल मधून बोलत असल्याचे सांगून अपॉइंटमेंट घेण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी बालिजेपल्ली सेतू माधवराव (वय ७९, रा. पाषाण) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्ह्टल्याप्रमाणे तक्रारदार यांना हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घ्यायची होती. त्यासाठी गुगलवर कोडबागी हॉस्पिटल सर्च केल्यावर आलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. कोडबागी हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे भासवून हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेण्यासाठी १० रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर अनोळखी लिंक पाठवून त्यावर क्लिक करून १० रुपये भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची खासगी माहिती सायबर चोरट्यांनी मिळवली. त्या माहितीचा वापर करून ६४ हजार ६५३ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. ही बाब तक्रारदार यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण हे करत आहेत.