Pune News | आयटी इंजिनिअरची बिहारच्या अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:14 AM2022-06-27T11:14:48+5:302022-06-27T11:24:44+5:30
सायबर चोरट्यांचा तब्बल पावणेचार लाखांना गंडा...
पुणे : गेले काही दिवस राज्यातील नागरिकांना रात्री-अपरात्री फोन करून तुमचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित होईल, असे महावितरणच्या नावाने गंडा घातला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यातही घडत असून, पुण्यातील आयटी इंजिनिअरला बिहारमधील घराचे वीज बिलाबाबत सायबर चोरट्यांनी तब्बल पावणेचार लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मोतीहारी येथील बिजली विभागातील एसडीओच्या नावाने सायबर चोरट्याने ही फसवणूक केली आहे. हे सायबर चोरटे पश्चिम बंगालमधील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहेत.
याबाबत धानोरी येथील एका आयटी इंजिनिअरने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ मे २०२२ रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. फिर्यादी हे पुण्यात राहत असून, बिहारमधील घराचे लाईट बिल मोबाइलद्वारे भरत असतात. त्यांच्या आईच्या मोबाइलवर आपका पेमेंट अपडेट नही है, आपका इलेक्ट्रीसिटी कनेक्शन आज रात को कट जायेगा, आप ऑफिसरसे बात करे, असा मेसेज आला. त्यावर दिलेल्या नंबरवर त्यांनी फोन केल्यावर त्या व्यक्तीने फिर्यादीस क्वीक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
त्यानंतर फिर्यादीच्या एसबीआय बँकेच्या संयुक्त खात्यातून साडेतीन लाख रुपये व त्यांच्या आईच्या खात्यातून २५ हजार रुपये असा ३ लाख ७५ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. त्यांनी याची तातडीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात पश्चिम बंगालमधील सायबर चोरटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.
महाराष्ट्रातही सायबर चोरटे अशाप्रकारे महावितरणच्या नावाने नागरिकांची फसवणूक करत असून, सायबर पोलिसांकडे याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत.
एसएमएसला प्रतिसाद देऊ नका
वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.